शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

हँगर !

साधारण १९९० च्या आसपासची गोष्ट आहे ही. दोन्ही बहीणींची लग्ने झाल्यावर आईला घरकाम व बाहेरची कामे यासाठी मिळणारी बहीणींची मदत बंद झाली. स्वयंपाकघरात माझा उपयोग खाणे सोडून बाकी कशासाठी होण्याची शक्यताच नव्हती तेव्हा सेकंड शिफ्ट असते तेव्हा लोळत पडलेला असतोस, टवाळक्या करत उंडारत असतोस तेव्हा निदान दादरला जाउन भाजी तरी घेउन ये , असा आईचा घोषा चालू झाला. ही भुणभुण शेवटी एवढी वाढली की झक मारत हातात पिशवी घेउन मी दादर गाठू लागलो ! काही काळ मी कुसकी, नासकी भाजी आणणे, किंमत न करणे, एकाच प्रकारची भाजी भरमसाठ आणणे असे प्रयोग करून बघितले पण आई काही त्याला बधली नाही. वैतागुन ती एकदाही ’बंद कर तुझी मदत’ असे काही बोलली नाही. अर्थात या नव्या जबाबदारीवर मी ही सवयीने खुष झालो. भाजी मंडईत गेल्यावर हिरव्या भाजीबरोबरच इतरही हिरवळ नजरेत भरू लागली हे मुख्य कारण असले तरी भय्या वजनात कसे मारतो, वसईची भाजी म्हणून कावड आणणारा ती भाजी दादरच्याच मंडईतुन कशी घेतो, रस्त्यावर भाजी विकणारे मंडईतुनच भाजी घेउन फूटपाथवर विकून कसे कमावतात, फेरीवाले गि‍र्हाइके कशी पटवितात, बोनीचा टाइम आनि बत्तीचा टाइम अशी कासावीस करून कशी फसवणुक करतात हे सर्व शिकता आले. अर्थात किंमत करणे हे मात्र मला केव्हाच जमले नाही. आई सांगायची, फेरीवाला जी किंमत सांगेल त्याच्या अर्धी किंमत करायची पण ’तो’ माझा चेहरा बघून आधीच चौपट किंमत सांगायचा व माझे सगळे आडाखे चितपट व्हायचे ! मग घरी गेल्यावर आई उद्धार करायची तो अजून जिव्हारी लागणारा असायचा.

एकदा असेच भाजी घेउन परतीच्या वाटेवर असताना एक फेरीवाला हँगर विकत होता. बर्याच दिवसापासून हँगर घ्यायचे होतेच तेव्हा त्याला भाव विचारला. डझनचा भाव त्याने सांगितला १२० रूपये ! मी आईच्या शिकवणी प्रमाणे भीत-भीत ६० ला देणार का असे त्याला विचारले आणि त्याने कोणतेही आढेवेढे न घेता ’डन’ केले ! मी हैराण झालो, काहीतरी गडबड नक्की असणार म्हणून मी ते हँगर बस मध्ये बसल्यावर अगदी निरखून बघितले, पण तसे काहीही नव्हते. घरी गेल्यावर आईने कसे घेतले असे विचारल्यावर मी धोरणीपणे, ६० बोलला होता पण ३० ला दिले असे ठोकून दिले. यावर आईची प्रतिक्रीया अगदीच अनपेक्षित होती. चला, थोडीतर अक्कल आली म्हणायची ! आज प्रथमच तुला भाव करून चांगली वस्तू घेता आली ! संध्याकाळ व्हायच्या आत ही बातमी आधी बिल्डींगमध्ये व मग कॉलनीभर पसरली आणि माझ्या तमाम मित्रांना “बघा, तो मराठणीचा मुलगा कसा व्यवहारी आहे ते , नाहीतर तुम्ही !” अशी हेटाळणी सहन करावी लागली. संध्याकाळी खेळ संपल्यावर याचा सूड म्हणून मला टपल्या मारायचा कार्यक्रम झाला व माझ्या व्यवहारीपणावर अविश्वास दाखविला गेला. ज्याला टीमसाठी बॉल नीट बघून घेता येत नाही तो स्वस्त आणि मस्त हँगर कसा घेतो हा युक्तीवाद बिनतोड होता. शेवटी मी त्यांना हँगर खरेदीचे रहस्य सांगून टाकले. घरी परतल्यावर तासाभरातच मित्रांच्या आया घरी धडकल्या व आम्हाला सुद्धा बंड्याला सांगून असे हँगर आणून द्या, आमच्या मुलांना काही व्यवहार कळतच नाही, तुमचा मुलगा खरेच किती गुणाचा हो ! असे माझे गोडवे गाउ लागल्या. म्हणता म्हणता ३० रूपये डझनच्या हिशोबाने तब्बल ४० डझन हँगरच्या ऑर्डरी १०० % ऍडवान्स सकट येउन पडल्या. मित्रांनी माझा चांगलाच गेम वाजविला होता ! सेकंड शिफ़्टचे उरलेले दोन दिवस मी पालिकेची गाडी फीरत असल्याने फेरीवाले गुल झालेत अशी थाप मारून टोलवले. आता माझ्याकडे पुढच्या सर्व आठवड्याची फुरसत होती. दादरला ३० रूपये डझनने कोणी हँगर देणारा मिळेल अशी शक्यताच नव्हती, अजून वेळ काढला असता तर खोटारडेपणा चावडीवर मांडला जाणार होता . एक खोटे सात खोटे बोलून सुद्धा पिच्छा सोडत नव्हते. शेवटी पदरमोड करून यातुन मान सोडवायची व पुन्हा या भानगडीत पडायचे नाही असे मी ठरवले.

शुक्रवारी माझा बॅचवाला, मुकादम उर्फ मुक्याला मी “क्यो बे, xx उपर करके रास्तेपे नमाज पढके हुआ क्या ? असे विचारतो पण यावेळी मात्र , कँन्टीनमध्ये चहा घेताना, माझे ध्यान बघून मुकादमने “क्यो बे, असा xx के माफिक चेहरा का केला आहेस” असे विचारले ! सगळा प्रकार मी त्याच्या कानावर घातला व कसा १२०० रूपयांचा खड्डा कसा बसणार ते हताश पणे सांगितले. यावर मुकादम एकदम खळखळून हसू लागला ! “अबे भटजी, तुमने दुनिया छोड, बंबईभी कहा देखी है ? अशी माझी उत्तरपूजा बांधली. चहा सोबत बिस्किटे माझ्याच पैशाने झाल्यावर “माझे ऐकशील तर तुला फटका बसणार नाहीच उलट ३००-४०० रूपये सूटतील” या मियाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे मला भागच पडले. ठरल्याप्रमाणे सगळे पैसे घेउन मी शनिवारी कामावर आलो. काम सूटल्यावर तो मला तडक महात्मा फुले मार्केट समोर असलेल्या बाजारात घेउन आला. प्लास्टीक मार्ट याच नावानेच तो भाग ओळखला जातो. फूटपाथवर प्लास्टीकचे विश्वच मांडलेले होते पण तिकडे मला ढूंकूनही बघायला न देता मुकादम मला एकेका गल्लीत फीरवत शेवटी फक्त हँगरच विकायला ठेवलेल्या एका दूकानात घेउन आला. हँगरमधली एवढी विविधता मी बाप जन्मात बघितली नव्हती ! अनेक प्रकारच्या हँगरमधून मी मोठ्या मुष्किलीने मला हवा असलेला प्रकार निवडला. मुकादमने दूकानदाराला त्याची किमत विचारली तेव्हा तो २२० रूपये बोलला ! माझे डोळेच फिरले,आगीतुन फूफाट्यात ! मी झटकन तिकडून कलटी मारायच्या विचारात असतानाच, मुकादम कानात कुजबुजला, “अबे ये १० डझन का भाव है” तेव्हा मला परत गरगरायला झाले ! ४० डझन घ्यायचे आहेत म्हटल्यावर दूकानदाराने मख्ख चेहर्याने “भाव नही होता, ये व्होलसेल मार्केट है” असे ठणकावले. खरेतर मी केव्हाच हातात रूपये काढून ठेवले होते पण मुकादम मला अजून चार दूकानात घेउन गेला. बरीच पायपीट झाल्यावर अजून फीरायला मी साफ नकार देताच त्याने मोठ्या नाराजीने एका दूकानात २०० रूपयाला १० डझन असा सौदा केला ! १२०० रूपयाचा फटका सोडाच माझ्या हातात नेट ४०० रूपये उरले होते ! अर्थात ज्यातुन चार पैसे मिळाले असा केलेला मी पहीला व शेवटचाच सौदा ! ते सुद्धा मुकादम बरोबर होता म्हणूनच !

कॉलनीत उशीरा, हातात दोन भल्यामोठ्या पिशव्या घेउन परतलो. घर गाठे पर्यंत निदान तिन-चार इमारतीमधून “ओ हँगरवाले” अशा हाका ऐकू आल्या पण मी त्या न ऐकल्यासारख्या केल्या. रातोरात सगळ्या हँगरची डीलिवरी पार पडली. रविवारी मित्रांच्या चेहर्यावर कसा कापला ? असे भाव होते. मला टोमणे मारणे चालू होते. माझ्या (अ)व्यवहारीपणाची रसभरीत वर्णने सांगितली जात होती. संध्याकाळी मी सगळ्यांना भेळ खाउ घातली व उद्या मेट्रो सिनेमाजवळ टीमसाठी बॅट व स्टंप सुद्धा घ्यायला जायचे असे सांगताच एकच गलका उडाला ! सगळ्यांनी एकाच सुरात “पैसे कधी / किती काढायचे ?” असे विचारताच मी “तुमच्याच बापाच्या खिषातुन मिळाले सुद्धा” असे उत्तर देताच सगळ्यांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह उमटले. मी घरी जायला निघताना त्यांना “अजून कोणाला हँगर हवे असतील तर सांगा, डझनामागे पाच रूपये कमिशन देतो” असे सांगायला विसरलो नाही ! अर्थात मुंबईतली व्होलसेल मार्केट हा प्रकार मग मी अनेकवार हिंडून पायदळी तुडवला व अनेकांना स्वस्ताईची ती वाट दाखविली सुद्धा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: