सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

गोरा भिकारी !

साधारण १९८५ मधली गोष्ट असेल. दादरला काही कामा निमित्त गेलो होतो. दादर पश्चिमेला फूलबाजार आहे, तिकडच्या रेल्वे पुलाखाली लोकांची गर्दी झाली होती. कुतुहुल म्हणून गर्दीचे कारण शोधायला गेलो व थक्कच झालो. एका गोरा, चेहर्यावरून तरी युरोपियन वाटणारा तरूण तिकडे उभा होता. केस विस्कटलेले, दाढीची खुंटे वाढलेली, टाय अस्ताव्यस्त, कोट उसवलेला, शर्ट अर्धवट खोचलेला, ढगाळ विजार व बूट विटलेले. चेहर्यावर अत्यंत विमनस्क भाव. गळ्यात त्याने वृत्तपत्राच्या पानावर स्केचपेनने खरडलेला मजकूर लटकवलेला होता तो फारच लक्षवेधक होता…

“I am British tourist. Some thugs robbed me here. I lost all my money, cards, contact details, passport and luggage. Please help me!”

John.

मुंबईतल्या माणसांना भिकार्याचे कसले अप्रूप असणार ? तशी भारताची बाहेरच्या जगातली ओळख भिकार्यांचा देश अशीच आहे. एरवी भिकार्यांना भीक न घालणारे बाबू लोक या गोर्या भिकार्याभोवती मात्र कोंडाळे करून उभे होते. कोणी त्या चोरांचा उद्धार करत होते, कोणी त्या चोराने आपली इमेज डागाळली असे म्हणत होते. त्याच्या पाटीचा अनेक भाषात अनुवाद करून विंग्रजी न समजणार्यांना लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडला जात होता. ज्या ब्रिटीशांनी आपल्या देशावर तब्ब्लल १५० वर्षे राज्य केले, सोन्याचा धूर निघणारा हा देश नागवला, त्याच देशातल्या एकावर आपल्या देशात टूरीस्ट म्हणून आला असताना लुबाडला जाउन भीक मागण्याची वेळ याते याच्या डागण्या अनेकांना अस्वस्थ करत होत्या. मग या पापाचे प्रायश्चित म्हणून गोर्या भिकार्याला मदत करण्यासाठी धक्का-बुक्की होत होती. त्याने आपली हॅट उलटी करून धरली होती. त्या हॅट मधून नोटा शब्दश: खाली पडत होत्या एवढी ती भरली होती ! एरवी ’बेगरला’ आठ आण्याच्या वर भीक न देणारे या गोर्याला मात्र निदान १० ची नोट ते २० रूपये त्याचे सांत्वन करून देत होते ! कोणी स्वयंसेवक बनून नोटा नीट लावून त्याच्या कोटाच्या खिशात ठेवत होते. तोडक्या मोडक्या इंग्रजीत त्याची माफी सुद्धा मागितली जात होती. गोरा मात्र तोंडातून एक चकार शब्द काढत नव्हता ! खाली घातलेली मान त्याने काही वर उचलली नव्हती ! भिकारी मग तो गोरा असो की काळा मी काही त्याला भीक कधीच घालत नाही. जरा वेळ हा तमाशा बघून मी घरची वाट धरली. पण एकंदरीत प्रकार जरा संशयास्पदच वाटत होता. जर खरेच तो ब्रिटीश नागरीक असता तर पोलिसांच्या मदतीने तो त्यांच्या देशाच्या वकिलातीत का नाही गेला ? हा प्रश्न मला पुढचे अनेक दिवस अस्वस्थ करत होता. गोरी चामडी बघितली की भुरळायची आपल्या लोकांची मानसिकता स्वातंत्र्यानंतरही बदलली नाही याची चीड होतीच.

अगदी काही महीन्यापुर्वीचीच गोष्ट. संध्याकाळी सीएसटी स्थानकाच्या वाटेवर लोकांचा घोळका जमला होता. नक्की तोच होता तो .. जॉन, गळ्यात तशीच पाटी अडकवून , त्याच स्टायलने तो उभा होता. सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा ! थोडा फरक होता, नोटा मात्र २०, ५०, १०० च्या होत्या, मधल्या काळात महागाई किती वाढली आहे ना ! अर्थात तेव्हा माझ्याकडून झालेली चूक पुन्हा होणार नव्हती. एका बाबतीत त्याला मानायलाच हवे. स्वत:ला काय मेंटेन केले होते त्याने ! त्याच्या सडसडीत अंगकाठीत काहीच फ़रक पडला नव्हता. गर्दीतुन वाट काढत मी जॉनच्या समोर उभा ठाकलो व त्याला “Hey John, so from last 20 years you are collecting money in India ! Let’s go to British Consulate, they will certainly help you if you are British!” हे ऐकल्यावर जॉनच्या चेहर्यावरचे भाव भरभर बदलायला लागले. आजूबाजच्या लोकांना सुद्धा हा काय प्रकार आहे ? असा प्रश्न पडला. मी त्यांना हा लोकांना फसविणारा भामटा आहे, त्याच्या गोर्या चमडीवर जाउ नका असे बजावले. लोक पांगले. मी जॉनचा हात धरला व त्याला टॅक्सीत बसवू लागताच तो गयावया करू लागला. त्याचा विदेशी मुखवटा पार गळून पडला. त्याला पोलिसात नेउन काही फ़रक पडला नसता. त्यांना हप्ते आधीच पोचले असणार, माझ्यासमोर त्यांनी थोडे नाटक करून त्याला सोडून दिलेच असते. मला त्याच्याबद्दल बरेच जाणून घ्यायचे होते. ही आयडीया त्याला सूचली कशी याचे कुतूहल होतेच ! मी त्याला एका टॅक्सीत कोंबले व गेट वे गाठले. पोलिसात देत नाही पण या भागात परत फ़िरकायचे नाही व तुझी सगळी स्टोरी, अगदी खरी, मला सांगावी लागेल असे म्हटल्यावर तो बोलता झाला.

तो चक्क मराठी होता. बी.कॉम झाला होता. सगळ्या अंगावर कोड आल्याने, की आणखीन कोणत्या रोगाने, त्याच्या त्वचेचा रंग लालसर, गुलबट झाला होता. केस त्याने डाय करून घेतले होते. त्याचे मित्र त्याला ब्रिट म्हणूनच चिडवत. नोकरी मिळायची शक्यता कमीच होती. भीक मागायची लाज वाटत होती व मागितल्यास देणार कोण हा प्रश्न होताच ! बेकार म्हणून भटकत असताना अनेक भारतीय गोरा साहेब समजून आपल्या मागे पडतात हे त्याच्या लक्षात आले. या मानसिकतेचा फायदा घ्यायचे त्याने ठरवले. त्याची आयडीया भलचीच क्लिक झाली ! अगदी सुपर-डुपर हीट ! अर्थात तो रोज भीक मागत नव्हताच. एकदा एका एरीयात भीक मागितली की त्या भागात तो सहसा परत जात नव्हता. देशातल्या बहुतेक शहरात या ’निमित्ताने’ तो पोचलेला होता. काही पोलिस ठाणी त्याने बांधून ठेवली होती. भीक मागताना एक शब्दही तोंडातुन तो बाहेर पडू देत नव्हता. इंग्रजी त्याचे तोडके-मोडकेच होते, तोंड उघडले असते तर त्याचे बिंग फूटलेच असते ! सर्वात मुख्य म्हणजे त्याची कमाई ! किती असावी ? काही अंदाज ? दिवसाला, काही तासात तब्बल १०,००० ते १५,००० रूपये ! एखादा नामांकित डॉक्टर सुद्धा एवढे कमवत नसेल ! अर्थात महीन्यातले १० दिवसच तो काम करायचा ! या पैशाचे तो करतो तरी काय ? बहुतेक मोठ्या शहरात त्याचे फ़्लॅट आहेत. कोठेही जाताना तो सगळ्यात वरच्या क्लासनेच प्रवास करतो. त्याचा स्टे नेहमी पंचतारांकितच असायचा. लग्न मात्र केलेले नाही !

माझी जिज्ञासा शमल्याने मला आता घरची वाट धरावी लागणार होती. मी निघालो तेव्हा तो एवढेच म्हणाला की तुम्हाला जो प्रश्न पडला, वकिलातीत जाण्याचा, त्याचा मात्र विचार मी प्लान करताना केला नव्हता. आश्चर्य म्हणजे एवढा लॉजिकल प्रश्न एवढ्या वर्षात कोणालाच पडला नव्हता, निदान त्याला तरी तसे कोणी विचारले नव्हते !

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

> 'आश्चर्य म्हणजे एवढा लॉजिकल प्रश्न (वकिलातीत ज़ाण्याचा) एवढ्या वर्षात कोणालाच पडला नव्हता.'
>------

दुसरं आश्चर्य म्हणज़े त्याला दोनदा पाहिलेला आणि त्याबद्दल चौकशी केलेला एवढ्या वर्षात तुमच्याआधी कोणीच निघाला नाही. ह्याबद्दल तुम्ही दोघे बोललात की नाही ?

हा ज़र बिहारी असता तर या धंद्यातही आपल्यात धडाडी नाहे म्हणून मराठी लोकांना त्याचा फारच राग आला असता, तेव्हा तो मराठी निघाला ही ईश्वराची कृपाच म्हणायची.

Aditya Panse म्हणाले...

वा...वा...! झकास पोस्ट आहे. तुमच्या ब्लॉगचा शोध मला नुकताच लागला आहे. मीही काही दिवस मुंबईकर होतो, पण आता स्वगृही परतलो आहे!

तुम्ही छान लिहिता - असेच लिहीत रहा!

--
आदित्य