रविवार, १ नोव्हेंबर, २००९

री-युनियन – असेही एक माजी विद्यार्थी संमेलन !

आठवीपर्यंत मी आगाशी,विरार येथील काशिदास घेलाभाई हायस्कूल मध्ये होतो. मग वडीलांना कार्यालयीन निवासस्थान मिळाल्यावर आम्ही सगळे वडाळ्याला शिफ़्ट झालो व नववी, दहावी मी वडाळ्याच्या ज्ञानेश्वर विद्यालयातुन केले. मैत्रीचे बंध ज्या वयात घट्ट होत असतात त्याच वयात शाळा बदलल्याने नव्या शाळेतील मित्रांशी माझी फ़ारशी नाळ जुळली नाही. त्यात कॉलनीतले मित्र म्हणजे अळवावरचे पाणी. वडील निवृत्त झाले किंवा त्यांची स्वत:ची जागा झाली की त्यांचा संपर्क कायमचा तुटायचा. शाळा सोबती म्हटले की म्हणूनच मला आगाशीच्या शाळेतलेच मित्र आठवतात. आगाशीतले बहुतेक मित्र तिकडले स्थानिकच होते तेव्हा आगाशी सोडून ते कोठे जायचा प्रश्नच नव्हता. नोकरी लागल्यावर मला फ़ार वाटायचे की एकदा आपल्या सर्व शाळा सोबत्यांना भेटायचे व त्यासाठी स्वत:च पुढाकार घ्यायचा. पण अनेक कारणांनी ते शक्य झाले नाही. पेपरात अधे-मधे इतर शाळांच्या री-युनियनच्या बातम्या वाचून मला गहीवर यायचा. तशा बातम्या मी अजूनही अगदी बारकाईने वाचतो. वडाळ्याच्या शाळेची ऑर्कुटवर कम्युनिटी आहे पण माझ्या १९८२ च्या बॅचमधला मी एकमेव सभासद आहे. बाकी सर्व सभासद थेट वाय२के मधले !

री-युनियनच्या ध्यासाने एका रविवारी अगदीच कासावीस झालो असताना मोबाईल वाजला. पलिकडून ’एकनाथ मराठे ना ?’ अशी विचारणा झाली व ’मी सुनील चुरी बोलतोय’ अशी ओळख दिली गेली आणि क्षणात मनाने आगाशीच्या वर्गात पोचलो ! सुनील माझा वर्गमित्र. त्याने चक्क आम्हा शाळासोबत्यांचे संमेलन आयोजित केले होते. त्यासाठी तो गेली काही वर्षे खटपट करत होता. माझा पत्ता त्याला योगायोगानेच माझ्या विरारला असलेल्या भावाकडून मिळाला व ४० पैकी ४० विद्यार्थी संपर्कात आल्यावर त्याने प्लान पक्का केला होता ! नालासोपार्याला एका रीसॉर्ट वर रात्री आम्ही सगळे एकत्र येणार होतो. ३०० रूपये शूल्क आल्यावर जमा करायचे होते. मला आता रात्रंदिवस ते संमेलन कसे असेल याचीच दृष्ये दिसत असत. कोण-कोण शिक्षक येणार असतील, आपल्याला ते ओळखतील का ? ओळखल्यावर ते आपल्याला खास ठेवलेल्या नावाने हाक मारतील का ? तसाच पाठीत धपाटा घालतील का ? त्यांना शाल व श्रीफ़ळ दिल्यावर त्यांच्या डोळ्याच्या कडा कशा पाणावतील याची कल्पना करताना माझेच डोळे पाणावायचे ! आपल्या बॅचतर्फ़े दहावीला शाळेतुन पहीला येणार्याला बक्षिस द्यायची माझी योजना मांडली की कसा टाळ्यांचा कडकडाट होईल या कल्पनेने सुद्धा मी मोहरून जायचो ! मी कामावर जो भेटेल त्याला आम्ही माजी विद्यार्थी कसे भेटणार याचे रसभरीत वर्णन करत होतो. त्यांना सुद्धा आश्चर्य, कौतुक वाटत होते. तब्बल २८ वर्षानी हा योग येणार होता.

कामावरून थेट मी विरार गाठले. आधी भावाच्या घरी गेलो. त्याला ते रिसॉर्ट माहीत होते तरी ठरल्याप्रमाणे नवापुरच्या तीठ्यावरच त्याला मी सोडायला सांगितले. वेळेआधीच मी तिकडे दाखल झालो व सुनील चुरीला मोबाईलवरून मी आल्याचे उत्साहात सांगितले. तो ही काही मिनिटातच बाइकवरून तिकडे हजर झाला. अर्थात इकडे-तिकडे बघत असल्यामुळेच मी त्याला ओळखले नाहीतर एरवी त्याने मला व मी त्याला ओळखणे कठीणच होते. तो खूपच जाड झाला होता, बाकी चेहर्यात फ़ारसा फ़रक पडला नव्हता. पुढच्या वीस-एक मिनिटात आम्ही दहाजण तिकडे जमलो, बाकीचे परस्परच रीसॉर्टला येणार होते ! मला ओळखयला त्यांना फ़ार वेळ लागला नाही पण मला दरवेळी डोक्याला भलताच ताण द्यावा लागत होता. आम्ही सर्व रीसॉर्टला आलो. बर्याच खुर्च्या हिरवळीवर मांडून ठेवलेल्या होत्या. तिकडे परस्पर आलेल्यांची ओळखपरेड सुद्धा चांगलीच रंगली. बाकि सर्व घरे जवळच असल्याने परस्परांना भेटत असणार, मी मात्र तब्बल २८ वर्षानी त्यांना दिसत असल्याने माझ्या भोवती काही काळ कोंडाळे जमले होते. शाळेत असताना दांडगोबा असलेले आता भलतेच मवाळ झाले होते तर तेव्हा शामळू असलेले अंगापिंडाने चांगलेच भरले होते. कोणाचा केशसंभार उतरणीला लागला होता, कोणाला विगचा आश्रय घ्यावा लागला होता तर कोणाला कलपाचा ! कोणाला टक्क्ल पडले होते, कोणी भरपूर मिशा वाढवल्या होत्या तर कोणी दाढी दीक्षितसुद्धा झाले होते.माझी शाळा सोडल्यानंतरची वाटचाल मी त्यांना कथन केली. सगळ्या मित्रांचे तसे बरेच चालले होते. कोणाची भात गिरण, केळ्याची बाग, फ़ुलबागा असल्याने शिक्षण त्यांनी फ़ारसे सिरीयसली घेतले नव्हते व आपल्या वडीलोपार्जीत व्यवसायात ते छान रूळले होते. काहींनी मात्र डीग्री, डिप्लोमा करून नोकरी, छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले होते. सुनील चुरी स्वत: इलाक्यातला लघुकारखानदार म्हणून फ़ेमस झाला होता. आगाशी सोडलेले मी व विनय ताटके असे दोघेच होतो. विनय माझ्या नेहमीच्या संपर्कातला होता.

इतक्यात एका गाडीतुन विदेशी दारूचे खोके व शीतपेयांचे क्रेट उतरवले गेले. आधी मला वाटले रीसॉर्टवाल्याने मागवले असतील पण ते सर्व आमच्याच मंडळींनी मागवले होते. दारू थंड ठेवण्याचा इंतजाम सुद्धा अगदी चोख होता. मद्यपान कोणी केले तर मला त्याचे वावडे अजिबात नाही पण शिक्षकांसमोर तरी असले प्रकार नको असे वाटून मी सुनील चुरीला शिक्षकांचा सत्कार आधी हो‍उन जाउदे, मग हे बाहेर आणा असे सुचवले तेव्हा तो उडालाच. कोण शिक्षक येणार आहेत ? त्यांचे काय काम इथे ? असे मला त्याने उलटेच विचारले ! अरे मग आपण जमलो कशासाठी ? या प्रश्नावर त्याने ’खाना पिना और मजा करना’ ही त्रिसूत्री सांगितली ! या धक्क्यातुन सावरायला मला बराच वेळ लागला. मी सावरेपर्यंत मद्यपींची मैफ़ल सुरू सुद्धा झाली होती ! माझ्यापुढे सुद्धा चषक केला गेला व मी घेत नाही असे सांगताच एकच गदारोळ उडाला ! बीपीटीत कामाला आणि दारू घेत नाही ? लगेच एकाने मला बीपीटी म्हणजे बेवडा पिउन टाइट असे सुद्धा ऐकवले. तु पित नसलास तरी पुढच्या पार्टीला दारूची सोय तुच करायचीस असाही लाडीक आग्रह झाला.

मी शीतपेय एका ग्लासात भरून सोबत थोडे खारे दाणे घेउन जरा बाजुलाच बसलो. आता इथून सटकणे सुद्धा शक्य नव्हते. तेवढ्यात विनय ताटके आला. तो सुद्धा माझ्याच पंथातला असल्याने शीतपेय घेत घेत एका कोपर्यात आमच्या गप्पा रंगल्या. आम्हाला शिकवणार्या शिक्षकांची सद्यस्थिती मला जाणून घ्यायची होती. इंग्रजी शिकवणार्या बाई अर्धांगवायुने घरीच पडून होत्या, सुतारकाम शिकवणारे चिखलकरसर दारूच्या पार आहारी गेले होते, गणित शिकवणारे चुरीसर अजूनही उदरनिर्वाहासाठी क्लास घेत होते. एनसीसीचे सर सुद्धा आजारपणाने अंथरूणाला खिळलेले होते. कालायतस्मै नम: ! माजी विद्यार्थी संघ नावाला उरला होता पण ८० च्या बॅचची मुले मात्र नियमित भेटतात, शिक्षकांचा आदरसत्कार करतात, कोणी त्यांना आर्थिक , वैद्यकीय मदत सुद्धा करते हे ऐकून मात्र खूप बरे वाटले. केसरी पाटील टूर्सचा संचालक (बहुदा) योगेश पाटील त्याच बॅचचा असल्याने सगळी आर्थिक बाजु तो सांभाळत होता. शेवटी विनय म्हणाला आपली बॅचपण जमते पण नुसती पिण्यासाठी, या वेळी तु येणार असे कळले म्हणून मी आलो, एरवी मी इथे फ़िरकलोही नसतो. पिउन झाल्यावर जेवणाचा का‍र्यक्रम होता पण मेनु सगळा मांसाहारी ! आम्ही दोघे दारू पित नाहीच वर शाकाहारी आहोत हे कळल्यावर परत आमचा प्रेमळ उद्धार झालाच ! रात्री बारा वाजता बाहेर तरी काय मिळणार ? शेवटी त्या रीसॉर्टच्या मालकाने आम्हाला स्वत:च्या घरी नेउन आमटी-भात करून वाढला ! सगळे जेवत असताना मी याच्या पुढे भेटू तेव्हा आपल्या शिक्षकांचा सत्कार करू व आपला एक माजी विद्यार्थी संघ स्थापून गुणवंत मुलांना काही बक्षिस ठेउ असे सुचवताच एकच कल्ला झाला. जो तो आपला आवाज टीपेला लावून सांगू लागला, कशाला ? काय फ़ूकट शिकलो आपण ? त्यांनी काय पगार घेतला नव्हता ? मग कोणाला बेवडा, कोणाला मारकुटा, कोणाला सर्कीट अशी शेलकी विशेषणे देत गुरूजनांचा शब्द-गौरव चालु होताच मी व विनयने परत कोपरा गाठला. सुनील चुरीने मग एक कागद फ़िरवला, सगळ्यांची नावे, मोबाईल नंबर, पत्ते, इमेल तो नोंदवून त्याच्या कॉप्या तो सगळ्यांना पाठवणार होता. त्याने मग ५०० रूपये वर्गणी मागताच मी उडालो. अरे ३०० ठरले होते ना ? या वर जरा बजेट वाढले म्हणून ५०० काढायला लागत आहेत असा खुलासा तयार होताच !

५०० रूपयात मला धड जेवायला सुद्धा मिळाले नव्हते व शाळेत असताना ज्यांना चहासुद्धा माहीत नसेल त्या सोबत्यांनी दारूचे खोके रीचवले होते व मांसाहार हादडला होता. पैशाचे काही दु:ख नाही हो, इतक्या लांबून, इतक्या वर्षानी मी ज्या ओढीने तिकडे आलो होतो, ज्याची कल्पना केली होती त्यातले प्रत्यक्षात काही म्हणजे काहीही उरतले नव्हते. विमनस्क अवस्थेत घर गाठले, चेहरा बघुनच बायकोला काय झाले असेल त्याचा अंदाज आला असावा. “काय झाले ?” असे एका शब्दानेही तिने मला विचारले नाही ! ऑर्कुटचे खाते उघडून बसलो. वडाळ्याच्या शाळेची कम्युनिटी ज्याने काढली होते त्याचा स्क्रॅप आला होता, “We are pleased to announce re-union of our schoolmates …” चला, निराश व्हायचे काही कारण नाही, निदान यावेळी तरी …. !

२ टिप्पण्या:

सागर म्हणाले...

Chala evdh naraj hou naka....Pudhlya veli tumhi aayojak vha an tumchya mataprmane te aayojit kara

Mahendra म्हणाले...

हं.. जग बदलतंय.. व्हॅल्युज बदलताहेत.. पण आपण या बदलत्या जगासोबत बदललंच पाहिजे असं नाही.. उत्तम पोस्ट... आवडलं.. सुंदर शब्दबध्द केलंय..