शुक्रवार, २१ ऑगस्ट, २००९

निरुत्तर करणारी दुरुत्तर !

सकाळी ६:४५ चा गजर लावलेला असतो पण जाग तशी त्याच्या आधीच आलेली असते. गजर झाल्यावरच उठायचे असा उसूल असल्याने करवटे बदलत गजराची वाट बघणे चालु असते. “तुझा विसर न व्हावा” चा एकदा ’गजर’ झाला की दिवस कसा मस्त जातो ! अचानक हिचा मंजुळ आवाज ऐकू येतो “लोळणे पुरे, कामावर जायचे आहे ना आज ?”. मी कुस बदलुन अजुन गजर कोठे झाला आहे असे विचारतो तेव्हा आतुन सात वाजले आहेत असे उत्तर येते. मी खडबडून उठतो, मोबाइल कडे झेप घेतो. त्याने केव्हाच मान टाकलेली असते. रात्रभर चार्जिंगलाच तर लावुन ठेवला होता, बिघडला बहुतेक ! मग समजते की कोणीतरी(?) स्वीचच ऑफ़ केलेला आहे, मग तो चार्ज होणार तरी कसा ? लगेच मी कडाडतो, कोणी स्वीच ऑफ़ केला ? आतुन लगेच प्रत्युत्तर येते “कशाला कोण बंद करतय ? मी इथुनच सांगते, तुम्ही भलताच स्वीच ऑन केल्यावर … तुमचा मोबाइल कसा चार्ज होईल ? दिवसाची सुरवात अशी झाल्यावर पुढे काय वाढून ठेवले आहे या विचारात मी गडबडीत बेसिन कडे धावतो. दाढीचे क्रीम टूथब्रशवर घेतलय हे मला त्याची चव घेतल्यावरच कळते ! मी तुला हजारदा सांगितलय , ज्या रंगाचे शेविंग क्रीम आहे त्याच रंगाची टूथपेस्ट का आणतेस ? माझा अगतिक सवाल ! यावर “स्वत:चा वेंधळेपणा सोड आधी, आणि इंग्रजी माध्यमातुन बी.कॉम. झाल्याची टिमकी वाजवतोस ना , मग जरा वाचता येत नाही का ?” एकदा कधी मी हिचे मराठवाडा विद्यापीठ आणि मराठीतुन घेतलेली वाणिज्य पदवी काढली होती त्याची शिक्षा पुढचे सात जन्म तरी भोगावी लागणार आहे ! आणि आता दाढी करताना टूथपेस्ट घेउ नकोस ! च्यायला, हिला कसे कळले ?

दाढी संपत असतानाच मुलांना उठवायची अवघड कामगिरी ही माझ्यावर सोपवते. मी मुलांच्या खोलीत शिरतो. “प्रसाद उठ” असे मंद्र, मध्यम आणि तार सप्तकात आळवत , शेवटी आता xx वर लाथ घालतो म्हणत सम गाठल्यावर चिरंजीव डोळे किलकिले करत, तुझे आता सगळे आवरून झाले का ? नाहितर दारावर टकटक केलेली तुला आवडत नाही , असे ऐकवतो. प्रियांकाला उठवण्याआधी माझे लक्ष तिच्या पसार्यावर जाते. मी कडाडतो, “प्रियांका, तावडतोब उठ आणि पसारा आवर आधी.” त्यावर ती म्हणते की हा पसारा नाहीच आहे, ही माझी वस्तु ठेवायची पद्धत आहे. माझी काही वस्तु मी तुला शोधायला सांगते का कधी ? उलट तुझाच मोबाइल दादा आईच्या मोबाइलवरून मिसकॉल देउन शोधुन देतो ! मी लगेच आउट ऑफ़ कवरेज एरीयात जातो ! मग डबा भरे पर्यंत थोडी साखरपेरणी झाल्यावर मी घर सोडतो.
सोसायटीच्या आवारात माझी स्कूटर अगदी पद्धीतशीर पणे ब्लॉक केलेली असते. मी “जटावसाब, आपकी गाडी निकालो, मुझे स्कूटर निकालनी है” असा खालुनच आवाज देतो. त्यावर जटावसाब “मेरी गाडी नेगीसाब के गाडी ने ब्लॉक की है, उन्हे भी जरा आवाज दो” असे सुनावतात. माझ्या वेळेशी त्यांना काहीच देणे घेणे नसल्याने मी नेगीसाबना पण आवाज देतो. पण तेवढ्या वेळात मला गाडी बाहेर काढायची एक पळवाट सापडते. एकच चौकट हलवुन १ ते १५ अंक क्रमाने लावायचा खेळ खेळून मी स्कूटर बाहेर काढतो. तोवर नेगी व जटाव बाल्कनीत येउन “सोसायटीवालोंकी जलन होती है हमारी गाडी देखके” असा डायलॉग मारतात. गाडी हॉर्न वाजवत मी मुख्य रस्त्यावर येत असतानाच तुफ़ान वेगात दोन रीक्षा, दोन्ही कडून येतात, आमचा त्रिवेणी संगम थोडक्यात हुकतो. दोघेही चालक एका सुरात “डोळ फ़ुटल काय” अशी आस्थेवाईक पणे चौकशी करतात. पे अँण्ड पार्क मध्ये मी नेहमीसारखीच शिस्तीत गाडी उभी करतो. इतका वेळ तमाकू मळत असलेला तिकडचा नोकर मी स्टेशनकडे निघालो की लगेच पिंक मारून “साहेब, तकडे नाय, अकडे घ्या” म्हणून फ़र्मावतो. त्याच्याकडे एक शूद्र कटाक्ष टाकून मी जात असतानाच “इंडीयात डीशीप्लीन अजबात रायली नाय बघा” म्हणून तो परत पिंक टाकतो ! डावीकडून चालावे हा नियम बहुदा मी एकटाच पाळत असावा. त्या मुळे पुलावरून मोबाईलवर बोलत येणारा कॉलेज कन्यकांचा थवा व मी एकाच बाजुला असतो पण दिशा विरूद्ध ! टक्कर टळते पण “स्कूल का कभी मुंह देखा है की नही” असा कुजकट टोमणा ऐकावाच लागतो.
गाडीत नेमकी दूसरी सीट मिळते. गाडी पनवेललाच पॅक होते. एखाद-दुसरा प्रवासी पायात येउन उभा राहतो. थोडी काळजी घेतली तर त्याला नीट उभे रहाता ये़ईल व मला सुखाने बसता ये़ईल असे मी त्याला सुचवताच तो “साला, अभीसे नाटक चालु किया ? बैठनेको मिला है तो शांति से वीटी तक बैठो ना, काय को खीट खीट करता है” असे सुनावतो. पुढच्याच स्थानकात धडाधड रॅकच्या रोखाने सामानाची फ़ेकाफ़ेक चालु होते. त्यातली एकाची बॅग माझा कपाळ मोक्ष करेल अशी रास्त शंका वाटल्याने मी तीच्या मालकाला ती नीट ठेवायची सूचना करतो. त्यावर तो “गिरा है क्या ? गिरेगा तो बोलनेका क्या !” अशी दमबाजी करतो. म्हणजे डोक्यावर पडल्यावर मी तक्रार करायला जिवंत राहणार नाही याची त्याला खात्रीच असते ! डोक्यावर लटकती तलवार घेउनच प्रवास पुर्ण होतो ! सूटलो एकदाचा !
कामावर येताच एकदमच सगळे फ़ोन सलामी दिल्यासारखे वाजू लागतात. ते कमी म्हणून मोबाईल सुद्धा खणखणू लागतो. एक फ़ोन उचलुन मी यांत्रिक स्वरात “नमस्कार, ये मुंबई बंदरगाह के अध्यक्षजी का कार्यालय है” असे म्हणताच, खाडकन फ़ोन कट होतो. दूसर्या फ़ोनवर कोणीतरी गोड आवाजात “न्हावा-शेवा बंदराचे नाव आता जवाहर बंदर झाले आहे का ? “हो”, त्याला बरीच वर्षे झाली असे सांगेतल्यावर “जवाहर बंदराचा नंबर काय ?” असे विचारते ! मी शक्य तेवढ्या नम्र पणे “मला माहीत नाही” असे सांगताच “तुम्हा लोकांना माहितीचा अधिकार वापरूनच सरळ केले पाहिजे” असे धमकावुन फ़ोन कट करते. तिसर्या फ़ोनवर कोणीतरी इंग्रजी पत्रकार साहेबाशी बोलु इच्छीत असतो. मी त्याला नाव , गाव, काय काम आहे असे विचारताच “साला, तुम पीए लोग बोलेगा तो ना, तुम्हारा साब भी उतना नही अखडता है, मेरा पास उनका मोबाइल नंबर है, उसपर करता है” असे ऐकवतो. चवथा फ़ोन असतो “बोनसचा फ़ॅक्स आला का ?” असे विचारणारा, मी नाही असे सांगताच, “साल्यांना माज आलाय खुर्चीचा” असे करवादतो ! थोडे स्थिरस्थावर झाल्यावर गार झालेल्या चहाचा घोट तोंडाला लावा तोच बटवड्याचा ढीग समोर ओतला जातो. एका दिवसात एवढी पत्रे ? असे मी चमकुन विचारताच, मागचे चार दिवस एकही पत्र आले नाही तेव्हा तंगड्या पसरून बसला होतातच ना ? अरे मग रोजच्या रोग का नाही आणत ? अहो हे सरकारी कार्यालय आहे, आम्हाला काही टाटा – बिर्लाचा पगार नाही मिळत ! असा बाणेदार जबाब मिळतो ! मध्येच आमच्या फ़ाइलचे काय झाले असे विचारणारा फ़ोन येतो. मी रेफ़रन्स नंबर सांगा, निदान विषय काय होता, केव्हा पाठवली होती, आमच्या कडे डायरेक्ट पाठवली की कोणा दूसर्या विभागातुन येणार होती असे प्रश्न विचारताच “तुमको शेपरेट कंप्युटर क्या सिर्फ़ गेम खेलने के लिये और नेट लगाने के लिये दिया है क्या ? जरा देखके बता. असा डोस दिला जातो. परत कामाचा डोंगर उडवत असतानाच मोबाइल वाजतो. नंबर अनोळखी असल्याने मी तो कट करतो. पण असे चारदा झाल्यावर तो घेणे भागच पडते. लगेच “अग प्रिया, आज कोणता ड्रेस घालणार ? अशी विचारणा होते. मी “प्रियांका नाही, तीचा बाप आहे” अशी दुरूस्ती करताच , “तुम्ही कशाला घेतला फ़ोन ? द्या तिला फ़ोन. असे उत्तर येते. मी कामावर आहे असे सांगितल्यावर “आजच बरे न विसरता फ़ोन घेउन कामावर गेलात , प्रिया सांगते माझा बाबा एक नंबरचा वेंधळा , विसरभोळा, --- ” . आत्मस्तुती ऐकुन न घेता मी फ़ोन कट करतो !
दमून भागुन घरी आल्यावर जिन्यात बायकांचे टोळके बसलेले असते. त्यांची मुले सुद्धा तिकडेच पसरून बसलेली असतात. शुक-शुक करून , खाकरून सुद्धा कोणी ढीम्म हालत नाही. तेव्हा मीच अंग संकोचून वाट करून घेत पुढे जाउ लागतो. तेव्हा कानावर , रोज इतनी देर कैसी होती है, मुझे तो ये इतना सीधा नही लगता जितना दिखता है, आणि शेवटी “बिचारी अनुजा” असे म्हणून माझ्या बायकोच्या फ़ुटक्या नशिबाला बोल लावला जातो !

साला, कोणाला काय बोलायची सोय नाय रायली बगा !

५ टिप्पण्या:

LaVish aka vishal kalel म्हणाले...

लई भारी. पु.लं. ची बटाट्याची चाळ आठवली. तुमचे character त्यांच्या कथानकात हिरो म्हणून परफेक्ट बसेल...

साधक म्हणाले...

तुफान. जबरी. खूप दिवसांनी काही तरी ओरिजिन्ल वाचले. एकदम बेस्ट.
"इंडीयात डीशीप्लीन अजबात रायली नाय बघा" हाहा. मस्त हसलो.
"हे सरकारी कार्यालय आहे, आम्हाला काही टाटा – बिर्लाचा पगार नाही मिळत " सुपर्ब. मुड फ्रेश झाला एकदम. आवडलं आपल्याला.

Anagha म्हणाले...

khup khuskhushit :) aavadle..

श्रद्धा म्हणाले...

mastch!

hanuman waghmare म्हणाले...

majja aali vaachtaana...