मंगळवार, १८ ऑगस्ट, २००९

विक्रम आणि वेताळ कथा – अध्यात्मिक गुरूंकडून जडवाद्यांचा मुखभंग !

विक्रमादित्य कोणालाही न जुमानता स्मशानात गेला. झाडावर लटकत असलेले प्रेत खांद्यावर घेउन तो झपाट्याने परत निघाला तेव्हा, प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला , “विक्रमा, तु स्वत:ला विज्ञानवादी समजतोस पण तु सुद्धा भौतिक सुखाला चटावलेल्या इ-काका सारखाच जडवादी आहेस, शेवटी त्याला सुद्धा अध्यात्मिक गुरूच्या हातुनच मुक्ती मिळाली ! जडवादी विक्रमाचे कुतुहुल चाळवले, त्याने वेताळाला इ-काकांची गोष्ट सांगायचा आग्रह केला. वेताळाने अट घातली की मध्ये बोललास तर मी परत झाडाला लटकायला मोकळा , बोल कबूल ? विक्रमाने अट कबूल करताच वेताळ सांगु लागला.

देशातल्या ११ प्रमुख बंदरात, सर्वात मागासलेले बंदर म्हणजे मुंबई बंदर ! तर त्या तसल्या बंदराच्या प्रमुखाचा सहायक होते इ-काका. हे इ-काका ’जात्याच’ अत्यंत उर्मट, नास्तिक , पाखंडी, असे होते. त्यांची वाणी तर नुसती गटार होती गटार, अतिशय शिवराळ, उपमर्द करणारी. कोणाचाही ते मुलाहिजा राखत नसत. तंगड्या गळ्यात घालणे, थोबाड फ़ोडणे, उताणा पाडणे, मातम करणे, शेपूट घालणे असली विशेषणे वापरून ते आपली भाषा सजवत. त्यांना कामावर काहीच काम करायचे नसल्याने कार्यालयाने दिलेल्या संगणकावर, हाय स्पीड इंटरनेट जोडणीच्या सहाय्याने, फ़ूकट मिळणारा चहा ढोसत, फ़ायलींच्या ढीगावर बसून त्यांची सदानकदा ऑर्कुटगिरी चाललेली असे. कोब्रा कट्ट्यावर आपल्या शाब्दिक प्रहाराने ते अनेकांना घायाळ करत. कट्ट्याचे मालक व निरीक्षक तर त्यांचे रोजचेच बकरे असत. त्यांच्या सारख्याच जडवादी लोकांच्या मदतीने देवा धर्माला मानणार्या सर्वाना त्यांनी अगदी त्राही भगवान करून सोडले होते. त्याच्या पुढे तो गझनीसुद्धा फ़िकाच पडला असता असा तो मुर्तीभंजक होता ! प.पु. उपरकराचार्य, ज्यांची किर्ती अगदी उपरतक (वर तक ) पोचली होती पुण्यनगरीत फ़ारच प्रसिद्ध होते. त्यांच्या अनुग्रहांकित चेल्याने आपले उपरतकाचार्य कसे सूक्ष्म देहाने मंगळावर गेले होते, त्याची सुरस कथा ऐकवली, हे तर काहीच नाही भौतिकवाद्यांची पंढरी असलेल्या अमेरिकेने केलेला यान जोडणीचा खर्चिक प्रयोग फ़सलेला त्यांनी कसा बिनपैशाच्या अध्यात्मिक शक्तीने पाहिला व मग त्या महासत्तेची जगात कशी छी-थू झाली याची कथा ऐकवली. एवढे सांगितल्यावर भाविकांच्या डोळ्यातुन घळाघळा अश्रू वाहु लागले. जो तो उपरतकाचार्यांचा जयघोष करू लागला ! अनुग्रह करा असे विनवू लागला ! मूढमती इ-काका नेहमीसारखेच कट्ट्यावर पडीक होतेच. त्यांनी ये सब बकवास है , अस म्हणत महान योगी उपरकराचार्यांना थेट थोतांडाचार्य असे हिणवले. पुरावा काय , रोकडे काय ते बोला, बिनपैशाचे अध्यात्म नाय चालणार असे सुनावले. त्यांच्या सुरात सुर मिसळून दूसर्या पाखंडयाने, नामे ए-दादाने, सूक्ष्म देहाने लास वेगासला जाउन, उंची मद्याचे घोट घेत, रमणींच्या सहवासात कॅसिनो खेळण्यासाठी अनुग्रह होईल काय असे पुसिले !

कलियुग म्हणतात ते हेच ! शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर कृष्णाने सुद्धा त्याचे डोके उडवले होतेच. इ-काकांचे तर शंभर सहस्त्र अपराध भरले होते. अनुग्रहांकित चेले त्यांच्यावर मिळेल ते शस्त्र घेउन तुटून पडले, माफ़ी मागा असा एकच नाद उसळला. मस्तवाल इ-काकांनी ती मागणी पार धुडकावली. संतप्त चेल्यांनी पुराव्याचे भेंडोळे इ-काकांच्या तोंडावर मारले. बिलंदर काकांनी त्याची सुरनळी केली व …. उरलेला चकणा त्यात टाकुन उलट प्रश्नांची सरबत्ती चालु केली.
१) हे संशोधन कोठेतरी प्रसिद्ध झाले होते का ? केव्हा ? म्हणजे महासत्तेने आपले संशोधन जाहिर करण्या आधी की मग ? प्रसिद्ध झाले नसल्यास का नाही झाले ?
२) अनेक जडवादी भारतीयांना नासा पोसते, शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा सन्मान करते, मग प्रकांड पंडीत उपरतकाचार्यांना त्यांच्या संशोधनासकट तिने का विकत घेतले नाही ?
३) दिव्य दृष्टीने मंगळाचे निरीक्षण केल्याचा दावा करणार्या उपरतकाचार्यांना लाल माती, दर्या, खाच खळगे दिसले हे जरी मान्य केले तरी मंद वार्याची झुळूक त्यांनी कशी अनुभवली ?
४) बरे मंगळावर गेले मग एवढ्या ४० वर्षात घरीच का बसले ? या ब्रह्मांडात मंगळच काय तो बाकि राहीला होता का ? एवढी सिद्धी प्राप्त असताना ते विमान, गाडी, बस, रेल्वे या भौतिक साधनानी प्रवास का बरे करतात ?
५) मंगळ दूर राहीला हो, महासत्तेला हवा असलेला व दडून बसलेला लादेन व भारताला हवा असलेला दाउद, याचा ठाव-ठीकाणा आचार्य देतील तर अमेरिका त्यांची सुवर्ण-तुलाच करेल व मायबाप भारत सरकार त्यांना निदान भारतरत्न तरी देइलच ! करतील का ते असे ?
६) महासत्तेने मंगळावर यान उतरवण्यापुर्वीच निखळ वैज्ञानिक संशोधन करून ही सर्व माहिती संकलित केली होतीच, यान उतरल्याने त्याची पुष्टी झाली. महासत्ता एवढ्यावरच थांबणार नाही, ती लवकरच मंगळावर माणूस उतरवेल अशी दर्पोक्ती केली. थोतांडाचार्यांची पुढची गुपचुप मोहीम कोणती असे कुत्सितपणे विचारले !

पाखंडी इ-काकांनी अजूनही स्वत:ला आवरावे , करूणा सागर उपरतकाचार्य त्यांचे अपराध पोटात घालुन त्यांना सुद्धा अनुग्रह करतील. मग पनवेल ते सीएसटी प्रवास लोकलने धक्के खात त्यांना करावा लागणार नाही ! माफ़ी मागा अन्यथा गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागेल असे बजावले. पण इ-काकांच्या जडवादाने बधीर झालेल्या मेंदुला ते कसे मानवणार ? त्यांनी आपला हेका सोडला नाही. जडवाद्यांच्या मजबुत पाठींबा असल्याने आपले कोणी काही वाकडे करणार नाही या भ्रमात ते होते. शेवटी मात्र अजडवाद्यांनी आपल्या एकत्रित ताकदीने (कॅप्टन प्लॅनेट आठवा !) इ-काकांना त्यांच्या टॉपिक सकट नष्ट केले !

बोल विक्रमा, बोल. इ-काका एवढे कोणाच्या जिवावर उड्या मारत होते ? त्यांचे गर्वहरण नक्की कशामुळे झाले ? या प्रश्नाचे उत्तर तुला माहीत असूनही तु दिले नाहीस तर तुझ्याच डोक्याची १०० शकले हो़उन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील.

सर्वज्ञ विक्रम बोलू लागला, इ-काकांच्या गमजा ए-दादाच्या पाठींब्यावर चालु होत्या. त्या ए-दादालाच उपरकराचार्यांच्या अनुग्रहांकित चेल्यांनी “महामायेने” सूक्ष्म करून लास-वेगासच्या कॅसिनोत अडकवुन ठेवले व मग लगोलग बंगलोर स्थित “आदी”मायेच्या अंगात शिरून बढाईखोर , पाखंडी इ-काकांचा गेम वाजवला.

विक्रमादित्याचे बोलणे संपताच वेताळ खांद्यावरून उडाला व थेट वडाच्या पारंबीला लटकू लागला. सात मजली हास्य करत म्हणाला “विक्रमा, तू बोलसास आणि फ़सलास ! मी परत मोकळा झालो !

२ टिप्पण्या:

अनिकेत वैद्य म्हणाले...

काका, तुमची मते मला पटली नाहीत.
तुम्ही टाकलेल्या टॉपिकचा मुख्य उद्देश हा सभासदांच्या दुट्टपी वागण्यावरचा होता. पुणे येथील एका व्याख्यानानंतर काही सभासदांनी व्याख्यात्याची केलेली प्रशंसा आणि दुसर्या एका टॉपिकवर उडवलेली खिल्ली ह्या दुट्टापी वागणुकीवर बोलणे अपेक्षित असताना तुम्ही त्या व्याख्यात्यावर घसरलात. त्यांचा धोतरात हात घातलात.
तुम्ही त्या व्या्यानाला उपस्थित नव्हतात. तेथे ते नक्की काय म्हणाले ही ऐकीव माहीती तुम्हाला आहे. जर तुम्हाला त्या बद्दल काही शंका असतील तर प्रत्यक्ष व्याख्यात्यांना भेटून विचारू.
सभासदांच्या दुट्टपी वागण्याचा राग व्याख्यात्यांवर काढणे चुकीचे आहे असे मला वाटते.

जाता जाता अजून एक गोष्ट, ते व्याख्याते साधारण ५० वर्षे (किंवा त्याहून ही जास्त) ह्या विद्येचा अभ्यास करत आहेत. आपला त्या विषयातला अभ्यास किती आहे?


अनिकेत वैद्य.

Arvind म्हणाले...

good one Eknath - liked it and enjoyed it too.
Carry on 1Nath