रविवार, ८ फेब्रुवारी, २००९

विघ्नहर्ता !


शनिवार असला तरी एवढी कमी गर्दी ? गाडी पनवेलला लागून काही मिनीटे झाली तरी खिडक्या रिकाम्या ? असा विचार करीत मी खिडकी जवळ बसलो. मग लक्षात आले की या बाजूला उन लागेल म्हणून बाजू बदलली पण तेवढ्यात कोणीतरी शिताफ़ीने तिकडची खिडकी पकडली. झक मारत मला त्याच्या बाजूला बसावे लागले. इतक्यात त्या मुसलमान तरूणाने माझे लक्ष वेधून घेतले. अहो मुसलमानच कशावरून ? नाही, निव्वळ दाढी ठेवली होती, डोक्यावर मुसलमानी टोपी होती आणि अंगात पठाणी पोषाख होता म्हणूनच नाही काही, पण एरवीही मला मुसलमान नक्की ओळखता येतो ! त्याने जेव्हा हातातले गिफ़्ट पॅक रॅकवर ठेवले आणि जागा असूनही दाराकडे उभा राहीला म्हटल्यावर मी अधिकच सतर्क झालो. तशी गाडी सूटायला अजून अवकाश होता व गर्दीही नव्हती, त्याचा कोणीतरी मित्र येणार असेल म्हणून उभा असेल अशी मी स्वत:ची समजूत घालून घेतली. पण आता तर गाडीही सूटली, खांदेश्वर स्थानक आले तरी काही हा तरूण आत येत नव्हता आणि आता तर तो मोबाईलवर कोणाशी तरी बोलत सुद्धा होता ! तेव्हा संशय बळावला नसता तरच नवल. काय असेल तरी काय त्या गिफ़्ट पॅक मध्ये ? फ़ोनवर कोणाशी बोलत असेल ?


मानसरोवर, खारघर, बेलापूर मागे पडले, गाडी आता गर्दीने अगदी फ़ुलून गेली. तो दारावर उभा आहे की नाही आणि त्याची ती रॅक वरची गिफ़्ट बघत राहणे मला फ़ारच त्रासदायक होउ लागले, पण त्याची मुसलमानी टोपी त्याचे अस्तित्व दाखवत होती आणि जरासे हायसे वाटत होते. त्यात काही बॉम्ब-बिम्ब असेल तर इतक्यात तरी काही त्याचा धमाका होणार नव्हता. पण तो आत्मघातकी पथकातला असेल तर ? बापरे !! का त्याला हवी तेवढी गर्दी अजून झाली नव्हती ? काय करावे ? माझ्या डोक्यात नुसते विचारांचे चक्र चालू होते आणि मेंदू प्रमाणाबाहेर दमल्यामुळे चक्क मध्येच डोळा लागला. त्या अवधीत गाडीने वाशी सोडले होते. आता तो तरूण दिसत नव्हता व ती गिफ़्ट सुद्धा ! हायसे वाटले, उगीच आपण संशय घेतला असेही वाटले.


याच समाधानात कुर्ला आले, गाडी बदलणार्यांचे लोंढे उतरून गाडी परत भरण्याच्या आत मला ते गिफ़्ट पॅक परत तिकडॆच दिसले. म्हणजे तिकडे होतेच ते पण वर अजून सामान पडल्यामुळे मला दिसत नव्हते ! पण मग तो कोठे गेला ? जागेवरून अर्धवट उभे राहुन मी सगळा डबा स्कॅन केला आणि परत भीतीने धडकी भरली. तो कोठेही दिसत नव्हता ! आता मात्र काहीतरी करायलाच हवे, पण काय ? साखळी ओढावी का ? का ओरडून सगळ्यांना सावध करूया ? पण मग लोक पॅनिक हो़उन चालत्या गाडीतुन उड्या तरी मारतील नाहीतर चेंगरून सुद्धा मरतील . नकोच ते ! मग पोलीसांना फ़ोन लावायचा का ? पण खरेच त्या पॅक मध्ये बॉम्ब असेल का ? नाहीतर उगाच आपले हसे होईल. का आपणच उतरून जावे ? छे, काय करावे हेच नक्की होत नव्हते. बरे, समजा बॉम्ब असला, फ़ूटलाच तर तो काही एवढा त्रीव्र नसेलही, अगदी जवळची माणसे मरतील आपल्याला फ़ारतर खरचटेल. आणि एवढी वर्षे मुंबईत आहोत, आता पर्यंत काही झाले नाही ना ? मग ? जे व्हायचे ते होणारच आहे ना ? आणि बॉम्ब जर फ़ूटायचा असेल तर आपल्याला थोडेच तो सांगून फ़ूटणार आहे, अगदी आपण उतरायला निघतानासुद्धा तो फ़ूटू शकतोच !


याच वैचारीक कल्लोळात गाडी एकदाची सीएसटीला लागली ! डबा रिकामा झाला. पण ते गिफ़्ट पॅक तसेच रॅक वर होते. निदान ते आता पोलीसात तरी जमा केले पाहीजे. पण ते आताच फ़ूटले म्हणजे, आधी आपण बाहेर पडू , पोलीसच काय ते करू देत , पण गाडी परत सूटली म्हणजे ? शेवटी मी ते पॅक घेतले हातात. पुढच्या कंपार्टमेंट मध्ये काय गडबड चालली आहे ? कोणीतरी झोपले होते व गदागदा हलवूनही उठत नव्हते. भीतीने माझी बोबडी वळली होती आणि हा कोण कुंभकर्ण ? अरे – हाच ’तो’ ! आत येउन झोपला कधी ? नक्की झोपला की याचा कोणी गेम केला आहे ? त्याच्याच साथीदारांनी ? कामगिरी पार नाही पाडली म्हणून ? ते पॅक मी माझ्या बॅगेत भरले व त्याला उठवायचा प्रयत्न केला आणि चपापलोच ! त्याचे अंग गार पडत चालले होते. गळ्याखाली हात लावून बघितले तर ठोके अगदी मंद झाले होते. एकाला सोबत घेउन मी त्याला उचलून गाडीबाहेर आणले. फ़लाटावरील एका बाकावर त्याला आडवे करून ठेवले. गडबड एकून पोलीसपण आले. कोणीतरी स्ट्रेचर सुद्धा आणला. आमची वरात आता चौकीत पोचली. आता रखडपट्टी होणार ! पोलीस दहा प्रश्न विचारणार, जावे निघून तडक असे वाटत असतानाच तिकडच्या अधिकार्याने ’तुम्ही जा , आम्ही काय ते बघून घेतो’ असे सांगून आश्चर्याचा धक्काच दिला ! मी लगेच निघालो आणि मोबाईल खणखणला, लगेच कामावर ये म्हणून. धावतपळत मग शेयर टॅक्सी करून कार्यालय गाठले.


दिवसभराच्या रामरगाड्यात मग तो प्रसंग मी पार विसरूनच गेलो. रोजच्यासारखेच कामावर सात वाजले व रात्री ऩउला घरी पोचलो. तरी बरे , उद्या रविवार होता. थोडा आराम मिळणार होता. रविवारी अगदी दिवसभर लोळावे असे अनेकदा वाटते पण सात वाजले आणि आपसूकच उठलो. मटा हातात घेतला आणि हादरलोच. सीएसटी स्थानक उडवून देण्यासाठी आलेल्या एका दहशतवाद्याला पोलीसांनी कंठस्नान घातले होते. त्याच्या जवळ एके ५६ मशीनगन व आरडीक्स असलेले बॉम्ब होते. संशयावरून त्याला पोलीसांनी हटकले तेव्हा तो पोलीसांवरच गोळीबार करून पळताना त्याला टीपले गेले. फ़ार मोठा धोका, प्रचंड जिवीतहानी टळली होती. त्या पोलीसांना लाखा-लाखाची बक्षिसे जाहीर झाली होती, त्यांच्यावर अगदी कौतुकाचा वर्षाव होत होता. दिवस-रात्र मग मिडीया तोच विषय चघळत होता. तो म्हणे सीमेपलीकडून आला होता, कडवे प्रशिक्षण घेउन व फ़िदायीन होता म्हणे !


सोमवार, आज डबा मिळणार नव्हता आणि मग यामुळेच बॅग पण धुतली जाणार होती ! कामावर पोचलो आणि लगेच हीचा फ़ोन आला, कोणासाठी गिफ़्ट आणली होतीस ? गिफ़्ट ? बापरे ! मी ताडकन जागेवरच उडालो, तो बॉम्ब चक्क माझ्या घरी होता आता ! ते फ़ेकून दे आधी लांब, असे मी तिला अगदी ओरडून सांगत होतो तर ती शांतपणे म्हणाली की आत तर गणपतीची मुर्ती आहे, पत्रिका , लग्न पत्रिका आहे. तू कोणालातरी लग्नात भेट द्यायला ती घेतली असणार आणि नेहमीप्रमाणेच विसरलास ! म्हणजे त्यात गणपतीची मुर्ती होती तर. परत हायसे वाटले. पण मग लगेच तो तरूण समोर आला . मुसलमान आणि गणपतीची मुर्ती ? काय संबंध असेल ? काय बरे त्याचे झाले असेल ? पोलीसांनी त्याला उपचारासाठी नेले असेल ना लगेच ? दिवसभर उलट-सूलट विचारांनी कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. अगदी अधीरपणे घर गाठले व लगेच ती मुर्ती व लग्न-पत्रिका बघितली.


ओके, म्हणजे त्याचा कोणीतरी हिंदू मित्र असावा. त्याच्या लग्नाला तो जात असणार हे मुर्ती भेट घेउन, आणि फ़ोन पण त्यालाच, किंवा आणखी कोणा मित्राला केला असणार ! त्या पत्रिकेवर एक मोबाइल नंबर लिहीलेला होता. चला, काहीतरी माग मिळाला तर ! त्या नंबर वरून फ़ोन करून त्या तरूणाची माहीती मिळणार होती, नाहीतर पत्रिकेतील कार्यालयाच्या पत्त्यावरून ज्याचे लग्न होते, तो तरी नक्कीच काही सांगू शकणार होता. मी त्या नंबरला फ़ोन लावला. कोणीतरी तरूण होता, त्याला मी सगळी स्टोरी कथन केली व त्या तरूणाचा नंबर अथवा पत्ता दिल्यास ती मुर्ती परत करायला मी तयार आहे , हे ही सांगितले. यावर बराच वेळ पलीकडून शांतता होती. मग एकदम अधीर प्रश्न आला, आप कहा रहते हो ? मै अभी आपको मिलना चाहता हूँ ! तो पनवेललाच रहात होता, व फ़ोन ठेवल्याच्या दहाव्या मिनीटाला घरी हजर झाला होता. त्याचा चेहर्यावर संमिश्र भाव होते, भेदरलेले, गोंधळलेले ! अंकल, रफ़ीक दो दिनसे घरमे आया ही नही है ! ना उसका नंबर लग रहा है, ना उसने किसीको कॉल किया है ! घरवाले काळजीत आहेत आणि पोलीसात तक्रार सुद्धा नोंदवली आहे, मिसींग म्हणून ! तो रफ़ीकचा मित्र होता. दोघे एकत्रच कामाला होते. रफ़ीक तसा मुंबईत नवाच होता. एका हिंदू मित्राच्या लग्नाला ते दोघे बरोबरच जाणार होते पण चूकामूक झाली व मग फ़ोनवर बोलून ठरल्याप्रमाणे रफ़ीक वडाळ्याला उतरून याची वाट बघणार होता. त्याला लहानपणापासूनच डायबेटीस होता. घाइ-घाइत तो काही न खाताच बाहेर पडला होता व म्हणूनच काळजी वाटत होती घरच्यांना. पण मग काही केल्या त्याचा संपर्क झाला नव्हता. त्याने आपल्या मोबाईलवर त्याचा एक फ़ोटो मला दाखवला. हो तोच तो , म्हणजे रफ़ीक होता. रफ़ीकला आपण ज्या दिवशी बेशुद्धावस्थेत चौकीत नेले त्याच रात्री चकमकीत एक अतिरेकी मारला जातो याचा काही संबंध तर नसेल ?


शरीफ़, रफ़ीकचा दोस्त, दूसर्याच दिवशी सीएसटी पोलीस ठाण्यात दाखल झाला. दोन-एक दिवसापुर्वी सकाळी, ज्या तरूणाला बेशुद्धावस्थेत येथे आणले त्याचे काय झाले पुढे, इतकाच त्याचा साधा प्रश्न होता. या साध्या प्रश्नाने पोलीस चौकीत स्मशान शांतता का पसरावी ? त्याला काहीच कळेना. वारंवार तोच प्रश्न विचारूनही त्याला काही उत्तर मिळत नव्हते. असा कोणी तरूण येथे आणला गेलाच नव्हता या उत्तराने मात्र तो उसळलाच ! त्याने मग ज्याने त्याला येथे आणले त्यानेच मला हे सगळे सांगितले आहे, कोठे आहे तो, काय केलेत त्याचे ? असे चढ्या आवाजात विचारायला सुरवात केली. आता बखोटीला धरून त्याला एका पोलीस अधिकार्यासमोर उभे केले गेले. हा जरा सज्जन वाटत होता. अगदी थंड स्वरात त्याने अगदी सविस्तर माहीती घेतली, काही कागदावर लिहुन सुद्धा घेतली. त्याला थोडावेळ बाहेर बसायला फ़र्मावले गेले, चौकशी करून सांगतो या हवाल्यावर तो बाहेर थांबायला तयार झाला. आतुन बरीच फ़ोनाफ़ोनी झाली. मग तो अधिकारी बाहेर आला. चलो, तुम्हे उसका ठीकाणा बताते है, असे सांगून त्याला जीपमध्ये घातले गेले. जीप सूटल्यावर वाटेत अजून दोन जण आत शिरले. त्याला ठीकाणा दाखवायलाच हवा होता …..


….. त्या ’मुसलमान’ तरूणाला बेशुद्धावस्थेत आणले तेव्हा फ़ौजदार राणे रात्रपाळी संपून निघायच्या तयारीत होते. त्या तरूणाला बघताच तो मेला असल्याचे लगेच त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या डोक्यात काही वेगळाच विचार चमकून गेला. त्याला आपल्या गाडीत घेउन ते निघाले. वाटेत फ़ोन करून त्यांनी आपले सहकारी, काळे व पाटील यांना बरोबर घेतले व सगळा प्लान समजावून सांगितला. काही पोलीस खोट्या चकमकी करतात, आपण तर एका मेलेल्या माणसाचीच तर खोटी चकमक घडवणार आहोत. हो ना करत ते ही तयार झाले. त्याची ओळख पार मिटवली गेली, मोबाईल, आयकार्ड नष्ट केले गेले. चेहरा ओळखता येणार नाही एवढा विरूप केला गेला. आधीच्या कोणत्यातरी प्रकरणात पकडलेली पण रीतसर जमा न केलेली एके ५६ व दारूगोळा वापरून बनाव छान वटवला गेला. बढती, पारीतोषिक, सरकारी घर, प्रचंड प्रसिद्धी यात ते तिघे अगदी न्हाउन निघाले. पोलीसी सेवेत एवढा सन्मान फ़ार कमी लोकांच्या नशीबी येतो ! कोणाला कोणता संशय यायचे कारणच नव्हते आणि अचानक हा तरूण टपकला. एरवी ’खुनाला वाचा फ़ूटतेच’ असे आपणच म्हणत असतो पण पोलीसांनी केलेल्या खूनाला पण कशी वाचा फ़ूटली ? आपले बिंग फ़ूटू नये म्हणून याचा सुद्धा बंदोबस्त करणे भागच होते ! याचाच नाही तर ’त्याचा’ सुद्धा बंदोबस्त करणे भागच होते ! त्याचा मोबाइल नंबर तर शफ़ीककडून मिळाला होताच. त्यावर फ़ोन करून त्याचा कार्यालयाचा पत्ता पण त्यांना कळला होता. संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच ते फ़ील्डींग लावून बसले होते. सावज नजरेच्या टप्प्यात आले की ----


पोलीसांनी फ़ोन करून मला जेव्हा कळवले की रफ़ीकला रूग्णालयात दाखल केले आहे. शफ़ीकची आणि त्याची ’गाठ’ घालून दिली आहे तेव्हा किती हायसे वाटले. खरेच पोलीस आपले काम करतच असतात, आपण उगीच त्यांच्याबद्दल भलते सलते बोलत असतो. चला सहा वाजले, निघायला हवे आता, असे म्हणून बाहेर पडणार तोच दिल्लीला गेलेल्या साहेबांचा फ़ोन आला, मला काही माहीती हवी आहे, ती लगेच इमेल करा ! म्हणजे निदान दोन तास तरी जागचे हलताही येणार नव्हते !


बाहेर जीप मध्ये सावजाची वाट पहात असणार्या त्या तिघांचा संयम आता संपू लागला होता. साला करतो काय आत इतका वेळ ? सात म्हणता म्हणता आठ-ऩउ वाजत आले. पण वाट तर बघावीच लागणार होती. एका रात्रीत केवढा मानसन्मान मिळाला होता ! तो टीकवण्यासाठी एवढे कष्ट काही फ़ार नव्हतेच ! राण्यांचा मोबाईल एवढ्यात खणखणला. हो – हो – ते सुद्धा आहेत – लगेच निघतोच, असे म्हणत त्यांनी जीप स्टार्ट केली व लगेच निघायला हवे, असे सगळ्यांना फ़र्मावत त्यांनी सूसाट वेगाने जीप व्ही.टी.च्या दिशेने पिटाळली.


मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरक्षा यंत्रणेच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले होते. अत्याधुनिक शस्त्रे असलेल्या आत्मघातकी पथकाने सीएसटीवर हल्ला बोल केला होता. शेकडो निरपराध मेले होते. त्यांच्या मागावर निघालेले पोलीस अधिकारी राणे, काळे व पाटील शहीद झाले होते. सारा देश हळहळत होता त्या वृत्त्ताने ! अनेकांच्या डोळ्यातुन अश्रूधारा वहात होत्या. माझेही डोळे पाणावले होते, अग याच निधड्या छातीच्या अधिकार्यांनी काही दिवसापुर्वीच सीएसटी स्थानकात स्फ़ोट करायला आलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता आणि तेच आता ----- ? या गोंधळाअतून सावरून, रात्री खूप उशीरा घरी पोचलेला मी जड आवाजात बायकोला सांगत होतो. आणि हो, तो रफ़ीक, गणपतीची मुर्ती-- तोच तो, सुखरूप आहे अगदी, शफ़ीक त्याला भेटला सुद्धा ! मला पोलीसांनीच कळवले, गणपती म्हणजे विघ्नहर्ताच तो, त्याचीच मुर्ती भेट म्हणून द्यायची त्याला बुद्धी झाली व त्यानेच त्याला तारले. उगाच जीवाला घोर लागून राहीला होता. ती काळजी मिटली तर आता ही बातमी, खरेच , ’त्याला’ वाचवणारा विघ्नहर्ता यांना वाचवायला का बरे धावला नाही ? इश्वराची लिला अगाध आहे म्हणतात ते उगाच नाही !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: