रविवार, २८ ऑगस्ट, २०११

…. पण राजा तर नागडा आहे !

गेले बारा दिवस दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांनी षड्डू ठोकला होता. दिल्लीतले केंद्र सरकार सुद्धा हादरले होते. समस्त देश , विशेषकरून तरूणाई अण्णांच्या साथीला होती. मिडीयाला सुद्धा टीआरपी वाढविण्यासाठी बिनपैशाचा तमाशा मिळाला होता. देशभर जणू दूसर्‍या स्वातंत्र्य लढ्याचाच माहोल होता. गेले दोन दिवस तर सरकारने ठाम भूमिका घेतली होती. कायदे करण्याचा अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांचा आहे. कोणीही दबाव आणून या अधिकारावर गदा आणू शकणार नाही. अण्णांचे जहाल असे जनलोकपाल डावलून सरकार सौम्य लोकपाल बिल आणू पाहत होती. भाजपा सारखा कसलेला विरोधीपक्ष सुद्धा निर्नायकी अवस्थेत होता. अण्णांच्या बाजूने कोणताही पक्ष अधिकृतपणे उभा नव्हता. आणखी ७ दिवस आपण उपोषण करू शकतो असे अण्णांनी जाहीर केल्यावर सरकारच्या नाकी नऊ आल्याचेच चित्र होते. काय होणार याची उत्सूकत अगदी शिगेला पोचली होती. सरकार अण्णांचा रामदेव बाबा करणार की सरकारच गडगडणार अशी स्थिती होती. कालपर्यंत उपोषण अजून किती चालवायचे याची अण्णा टीमला काळजी पडली होती तर अजून किती काळ सलाइनवर रहायचे असा सरकारपुढे प्रश्न होता. कोणीतरी पड घ्यायलाच हवी होती. पण कोणी पडल्याचे सोंग करायचे ? अण्णांनी उपोषण सोडले तर त्यांच्या मागे असलेली तरूणाई त्यांना कचखाऊ म्हणायचा धोका होता, सरकारने पडान घेतले तर विरोधी पक्ष त्याचा मुद्दा करणार होता. अर्थात मिडीयाला मात्र त्याने काहीही फरक पडणार नव्हता. ढोल काय कोठूनही वाजतो !


 

अति झाल्यावर दोन्हीकडून हालचाली सुरू झाल्या. पडान तर घ्यायचे पण दूसर्या पार्टीने पडला म्हणून हसायचे नाही ऊल्ट मीच माती खाल्ली असे म्हणायचे, असा काहीतरी मध्यममार्ग निवडण्यात आला. शेवटी महाराष्ट्रातले फिक्सर नेत दोन्ही बाजू लढू लागले. राजाला नागडा तर फिरवायचा पण बघणार्यांनी त्याला नागडा न म्हणता, वा, काय दिव्य वस्त्रे परिधान केली आहेत असे म्हणायचे असेही ठरले ! मिडीयासुद्धा हसत हसत या तोडग्यात सामील झाला. ठरल्याप्रमाणे अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या संसदेत मान्य झाल्याचे फर्मान घेवून इलासराव रामलीला मैदानावर आले. त्यांनी अण्णांना डोळा मारला व अण्णांनी संकेत समजून उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले ! जनलोकपालाची दिव्य वस्त्रे घालून अण्णा रामलीला मैदानावर जमलेल्या जनसमुदायाला सामोरे गेले ! सर्व देशभर क्रांती यशस्वी झाल्याचा जयजयकार झाला. मिडीया अण्णा ट्यून आळवू लागला. जय हो !


 

म्या पाप्याला मात्र अण्णांची दिव्य वस्त्रे दिसत नाहीत बाबा ! अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या होत्या १)पंतप्रधानांना जनलोकपालाच्या कक्षेत आणणे २) न्याययंत्रणा जनलोकपालाच्या कक्षेत आणणे ३) सर्व सनदी अधिकारी जनलोकपालाच्या कक्षेत आणणे. आज पेपरात, मिडीयात सगळीकडे ३ प्रमुख मागण्या मान्य झाल्याचा ढोल बडविला जात आहे. यातली एकही मागणी प्रमुख नाही ! पेपरात आज प्रमुख म्हणून मान्य झालेल्या मागण्या खरेतर अगदी तिय्यम दर्जाच्या आहेत. नागरिकांची सनद, कनिष्ठ नोकरशाही योग्य यंत्रणेद्वारे लोकपालाच्या कक्षेत आणणे व राज्यात लोकायुक्त या प्रमुख मागण्या कधी होत्या ? कनिष्ठ नोकरशाही चौकशीच्या फेर्यात आणणे ही प्रमुख मागणी ? अहो मुंगीला चिरडण्याकरीत एके ४७ कशाला हवी ? लोकांना बनवायचे तरी किती ? आणि या साठी अण्णांनी एवढा अट्टाहास केला होता ? सरकारने अण्णांना सरळ-सरळ गुंडाळले आहे, त्यांचा अगदी मामा केला आहे ! अण्णा जिंकले म्हणून जी दिव्य वस्त्रे घालून लोकांचे अभिवादन स्वीकारत चालले आहेत ती खरे तर वस्त्रच नाहीत ! राजा नागडा आहे ! पण सांगणार कोण ?

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

भ्रष्टाचार हा पैसा उकळण्यासाठी केला जातो हे या लोकांचे गृहीतच चुकीचे आहे. आपले उपद्रवमूल्य सिद्ध करण्यासाठी ही अडवणूक केली जाते.

अनामित म्हणाले...

एक दम खर
राजा नागडा आणि प्रजा आंधळी ...