सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

नात्यांचा गुंता – अमेरिकन इश्टायल !

एक भारतीय तरूण संगणक अभियंता एका बारमध्ये मद्याचे पेल्यावर पेले रिचवत असतो. एक अमेरिकन त्याचे पिणे बघून काळजीत पडतो. अर्थात तो सुद्धा लास झालेलाच असतो. भारतीय तरूणाला तो त्याचा गम आपल्याशी बोलून हलका करायला सांगतो. बांध फूटल्यासारखा भारतीय तरूण आपली ष्टोरी त्याला सांगतो. त्याच्या आई-वडीलांनी भारतात त्याचे लग्न एका सो कॉल्ड खानदानी मुलीशी ठरविलेले असते. अर्थात यात त्या तरूणाची संमती घ्यायचा प्रश्न येतोच कोठे ? त्यांनी परस्पर मुहुर्त काढून त्याला थेट लग्नालाच बोलाविलेले असते. त्याने आपल्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करणार असे सांगताच मोठा ड्रामा होतो, आम्ही ठरविलेल्या मुलीशी लग्न न केल्यास खानदानची इज्जत जाइल व मग आमची अर्थीच उचलायला तुला यावे लागेल अशी फिल्मी डायलॉगबाजी सुद्धा होते. ज्या मुलीला कधी बघितले सुद्धा नाही त्या मुलीशी लग्न करायला भारतीय तरूण अजिबात तयार नसतो पण आई-वडीलांच्या विरोधात जायची धमक तरी त्याच्यात कोठे असते ! भारतीय विवाह पद्धती कशी व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करते हे तो त्या अमेरिकेनला अगदी पोट तिडीकीने सांगत असतो. अमेरिकेतले मोकळे ढाकळे वातावरण , प्रेमात कोणाचीही आडकाठी नसणे, डेटींग, झट मंगनी, पट शादी , तितक्याच झटकन घटस्फोट याचे तो अगदी तोंडभरून कौतुक करीत असतो. प्रेम विवाह हीच विवाहाची आदर्श पद्धत आहे हे तो अगदी ठासून सांगतो.


तुला आमची संस्कृती एवढी आवडते ? अमेरिकन त्याला विचारतो. आता अमेरिकन तरूण त्याला आपली ष्टोरी सांगू लागतो. त्याने एका प्रौढ विधवेबरोबर 3 वर्षे संबंध ठेवून, अगदी आपण मेड फॉर इच अदर असल्याची खात्री पटल्यावर लग्न केलेले असते. त्याला घरचा विरोध बिरोध काही होत नाही हे कळल्यावर भारतीय तरूण परत अमेरिकन संस्कृतीचा उदो उदो करतो ! अमेरिकेन त्याचे बोलणे पुढे चालू करतो. काही वर्षानी त्याचे वडील त्याच्या सावत्र मुलीच्या अर्थात त्याच्या बायकोच्या मुलीच्या प्रेमात पडतात ! अर्थात यथासांग कोणताही विरोध न होता त्यांचेही लग्न होते ! या नाते संबंधामधून त्याचे वडील त्याचे जावई होतात तर तो वडीलांचा जावई होतो ! आता कायद्याने त्या अमेरिकनाची मुलगी (सावत्र ) त्याची आई होते आणि बायको तर चक्क त्याची आजी ठरते ! पुढे त्याला मुलगा झाल्यावर अजून धमाल होते ! त्याचा मुलगा होतो त्याच्या वडीलांचा भाउ व अर्थात त्याचा काका ! भारतीय तरूणाच्या डोळ्यासमोर या नात्यांच्या गुंत्यामुळे काजवे चमकू लागलेले असतानाच अमेरिकन कथा पुढे सुरू करतो. खरा गुंता होतो त्याच्या वडीलांना मुलगा होतो तेव्हा ! आता वडीलांना झालेला मुलगा त्याचा भाउ सुद्धा असतो तसेच नातु सुद्धा ! म्हणजे तो आता एकाच वेळी आजोबा सुद्धा असतो आणि नातु सुद्धा ! आता बोला ! काय कप्पाळ बोलणार भारतीय तरूण ? तो लगोलग इंड्यात फोन करून लग्नाला तयार असल्याचे कळ्वून टाकतो !

1 टिप्पणी:

शिरीष म्हणाले...

बऱ्याच दिवसांनी काहितरी वाचून निखळ हसलो..