बुधवार, ३ जून, २००९

खेळीया !

संध्याकाळी पाच वाजता कॅन्टीन मध्ये बसुन चहाचे घोट घेत असताना मला आता पुढे काय याची काळजी पडली होती. मित्राला मी हेच सांगत होतो की काय साली आडवेळेची गाडी आहे, पहाटे ३.३० वाजता ही काय एक्सप्रेस सोडायची वेळ झाली का ? इतका वेळ मुंबई सेंट्रलच्या परीसरात सामान सांभाळत काढावा लागणार होता. एवढ्यात एक प्रसन्न व्यक्तीमत्वाचा माणूस आम्हाला सामोरा आला. अत्यंत अदबीने तो बोलला “माफ़ करना, आपकी बाते मुझे सुनाई दे रही थी. इस नाचीज को विवेक शर्मा कहते है, आप मेरे घर तशरीफ़ लिजीये, मेरा घर स्टेशन के पास ही है. आप मेरे घर पधारे, भोजन के बाद, कुछ गपशप करेंगे , मै आपको सही समय स्टेशन छोड दूँगा”. मी पण तेवढ्याच नम्रतेने “माफ़ किजीये, न्योते का शुक्रीया, लेकिन मै आपको पहचानता भी नही …” माझे वाक्य त्याने अर्धवट तोडले व म्हणाला की मी तुमच्या बोराडे साहेबांचा मित्र आहे व तुमच्या बद्दल सुद्धा बरेच ऐकून आहे, संकोच बाळगायचे कारणच नाही. तेव्हा माझ्या वतीने बोराडेने परस्परच होकार देउन टाकला व विचार कसला करतोस, जाच, याची बायको साक्षात अन्नपूर्णा आहे ! माझा होकार ग्राह्य धरून त्याने केव्हा निघायचे असे विचारले व काही काम नसल्यामुळे मी कधीही, आता निघालो तरी हरकत नाही असे सांगितले . तो ही तयार झाला. रस्त्यावर त्याने टॅक्सी थांबवली व आम्ही आत बसलो. मी अहो कशाला उगाच, ट्रेनने गेलो असतो की, असे म्हणताच परत तो अदबीने म्हणाला की आप तो अब हमारे मेहमान है, आपको कतई भी तकलीफ़ नही होनी चाहीये ! प्रवासात त्याचा चांगला परीचय झाला. त्याला दोन मुले होती. त्याची बायको संगणकातली पदवीधर असून सुद्धा गृहीणी होती, त्यानेच तीला घरासाठी नोकरी सोडायला लावली होती, अर्थात त्याच्या शब्दा बाहेर ती नव्हती ! हे सर्व ऐकल्यावर मला त्याच्या बद्दल नेमके मत बनवणे जड जात होते. मला राहुन राहुन आश्चर्य सुद्धा वाटत होते की पुर्णपणे अपरीचीत माणसाकडे जायला मी तयार तरी कसा झालो ?

घराचा दरवाजा उघडला जाताच मला जाणीव झाली वातावरणात भरून राहीलेल्या दडपणाची ! त्याच्या बायकोने हसून स्वागत केले. मी जवळच्या सोफ़्यावर बसलो, चप्पल बाजूला काढली, माझी बॅग तिने आत नेउन ठेवली. मग मात्र भन्नाट प्रकार घडू लागले. तिने नवर्याच्या पायातले बूट काढले, ते रॅकमध्ये ठेवले, आम्हा दोघांना ट्रे मधून पाणी आणले, आमच्या हातात काय दिले, रिकामे ग्लास परत स्वत: घेउन ट्रे मध्ये ठवले. चहा देताना पण तेच, आमचा चहा पिउन होईपर्यंत ती तिकडे उभीच होती. मग नवरोजी हात पाय धुवायला गेले तेव्हा ती चक्क बाहेर नॅपकीन घेउन उभी होती. मग त्याच्या हातावर तिने परीटघडीचे कपडे ठेवले. मला तर वाटले तो एरवी तिच्या कडून ते घालुन पण घेत असावा ! मी सुद्धा हातपाय धुउन फ़्रेश झालो पण तिने द्यायच्या आत शिताफ़ीने नॅपकीन घेउन तसाच परत ठेवला. यावर यजमान जरा नाराज झाला, आप क्यो तकलीफ़ लेते हो, घर अपनाही है समझो, हम तो मेहमान को भगवान समझते है ! आत मुलांचा कल्ला चालु होता, मी तिकडे गेलो. नुसता पसारा पडला होता. तो बघुन त्याने बायकोला हाक मारली व मुलांची खोली आवरायला सांगितले. मुले काही अगदीच लहान नव्हती. तिने आतुनच आवाज दिला, आ रही हूँ ! म्हणजे ही सगळी मेहमान नवाझी तिच्या जीवावर चालली होती. घरातला बाकी कोणी इकडची काडी सुद्धा तिकडे करत नव्हता. मी काही निश्चय केला. सुरवात मुलांपासून करणेच योग्य होते. मी मुलांना विचारले, कहानी किसे सुननी है, दोघे अगदी एका सुरात मुझे असे ओरडले. तो फ़ीर ये सब अपनी जगह पे रखो पहीले. लगेच सर्व पसारा दूर झाला. मी गोष्ट चालु केली कृष्णाची. त्याचे बालपणीचे पराक्रम , खोड्या, मित्रांबरोबर मस्ती असे सांगत सांगत मी ट्रॅक वळवला त्याच्या सर्वात मोठ्या गुणाकडे – स्वावलंबन. तो कसा पहाटे लवकर उठायचा, गुरे स्वत: चरायला घेउन जायचा, त्यांची निगा राखायचा, राजाचा मुलगा असूनही सगळी कामे करायचा, शिकत असताना लाकडाच्या मोळ्या सुद्धा आणायचा, मोठेपणी आपल्या घोड्यांना स्वत: खरारा करायचा, राजसूय यज्ञाच्या पंक्तीत तर त्याने चक्क उष्टे-खरकटे काढले होते. का कोण जाणे, काहीतरी जबरदस्त इम्पॅक्ट निर्माण करण्यात मी यशस्वी झालो होतो. मुले अगदी तल्लीन झाली होतीच पण यजमान सुद्धा त्याचा आनंद लूटत होता.

इतक्यात वर्दी आली, खाना तयार है ! बाहेर येउन बघतो तो काय तीने एकटीनेच सगळी मांडामांड केली होती. आम्ही पानावर बसलो, ती वाढायला थांबली. मी, तुम्ही पण आमच्या बरोबर बसा असे आग्रहाने सांगताच ती एकदम कावरी-बावरी झाली, नवर्याकडे तिने बघितले, त्याने नजरेनेच होकार देताच तिला धक्काच बसला. आता मला वातावरणातला मोकळेपणा जाणवू लागला होता. एकदम फ़्री वातावरणात आमच्या गप्पा रंगल्या. आणि खरेच ती अन्नपूर्णा होती ! तिच्या सुगरणपणाचे गोडवे गाताना मला शब्द अपुरे पडत होते. जेवण संपत येतानाच मी मुलांना विचारले, कृष्ण कसा होता ? एकासुरात उत्तर आले, स्वावलंबी ! मग आजपासून सगळ्यांनी आईला सगळे आवरायला मदत करायची ! चक्क यजमानसाहेब सुद्धा मग आवरायला लागले. आवरे पर्यंत अकरा वाजले, मुले अजून काही गोष्टी ऐकून झोपी गेली. मग आमचा गप्पांचा फ़ड जमला. त्याची बायको विलक्षणच होती. तिचे वाचन व पाठांतर अफ़ाट असेच होते. ती बोलत असताना तिचा नवरा तिच्याकडे कौतुक मिश्रीत नजरेने बघत होता. तिची एक नवीच ओळख त्याला होत होती जणु ! २.३० वाजले. निरोपाची वेळ आली ! वातावरण एकदम भावुक बनले. असह्य शांतता पसरली. मग त्याने माझा हात हातात घेउन बोलायला सुरवात केली, गदगदलेल्या स्वरात तो म्हणू लागला की तुम्ही तर मेहमान नाही भगवानच आहात. माझ्या अहंकाराचा तुम्ही पार चकनाचूर करून टाकला. तुमच्या गोष्टी ऐकताना काही वेगळाच फ़ील येत होता. आजसे मै बीबीका हर काम मे हाथ बटाउंगा, मेरे काम खुद करूंगा, ये मेरा आपसे वादा है. भगवान की लिला भी अजब है, बिना पहचान मै आपको बुलाता क्या और आप भी बिना हिचकीच आ जाते हो , सब अजिब है ! और सबसे बडी बात, आपने मेरे बीबी को मानो नया जनम दिया, उसे इतना खुश, एवढे भरभरून बोलताना, मोकळेपणे हसताना मैने आजतक कभी नही देखा था. त्याच्या बायकोच्या डोळ्यातुन तर अश्रूंची नुसती संततधार लागली होती. जणु “सजल नयन जलधार बरसती”

चलो भाभी, चलता हूँ, आप सब अब पनवेल आना , असा न्योता देउन बाहेर पडलो. एक करो, ये नेम-प्लेट बदली करो, नया बनाओ, जिसपर भाभी का भी नाम हो ! यावर तो “जरूर” असे प्रसन्न पणे बोलला. भाभीला काहीतरी बोलायचे होते, पण तिच्या तोंडून आवाजच फ़ूटत नव्हता, बर्याच मुष्कीलीने तिच्या तोंडून “भय्या …” एवढेच आर्त पणे बाहेर पडले. आता मात्र मला स्वत:ला भावनावश होण्यापासून सावरण्यासाठी तडक निघणे भागच पडले.

शनिवारीच त्याने फ़ोन केला होता, आवाजात प्रचंड उत्साह, आम्ही सगळे तुमच्या कडे रविवारी येत आहोत, अगदी तुझ्या भाषेत, सहकुटूंब सहपरीवार ! और बच्चोंका मेसेज है की जितनी स्टोरी आती है, सब तय्यार रखना !

घरी बायकोला हे रात्री सांगणार एवढ्यात त्याचा परत फ़ोन आला, माफ़ करना, मेरी नानी गुजर गई है, हम सब पुना जा रहे है, फ़िर कभी. रात्री अकरा वाजत परत फ़ोन, बच्चोंको आपके घर छोडता हूँ, वो माहौल में बच्चे …और कल दोपहर हम दोनो आते है. मी म्हणालो, ठीक है, लेके आओ, मै पनवेल डेपो के पास आता हूँ. मी त्यांच्या सुमोची वाट बघत पनवेल डेपो जवळ उभा होतो. ११:३० वाजता पुन्हा फ़ोन, अरे भाई, माफ़ करना, मै रास्ता भूल गया, कळंबोली सर्कल से मुझे पुराने हाय-वे - पनवेल डेपो की ओर मुडना था, मै स्पीड मे आदतसे सीधा एक्सप्रेस हायवे पर आ गया. बादमे ध्यान मे आया, अब लेट हो जायेगा, वैसे बच्चे भी सो गये है ! मी एकटाच घरी परतलो.

सकाळी पेपर चाळत होतो. सकाळाच्या टुडे पुरवणीत सुमोला झालेल्या अपघाताची बातमी फ़ोटोसह दिली होती. अजस्त्र डंपरच्या धडकेने तिचा पार चेंदा-मेंदा झाला होता. सुमोतले अख्खे कुटुंब, नवरा, बायको व दोन लहान मुले, ऑन दी स्पॉट ठार झाली होते. मृतांची ओळख पटली असून, मुंबई बंदरात कामाला असलेले …….

४ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Chhan Lihale !
Pan Ghatana khaokharach Satya ahe ka ? Pls reply

Prasad Kulkarni म्हणाले...

फारच छान...पण शेवट मनाला खटलका.ही गोष्ट खोटी निघो..कारण देव इतका निर्दयी अस्उ शकत नाही..
प्रसाद (http://prawas.wordpress.com)

Hansraj म्हणाले...

kharokhar ghadlay ka he asa !

pan tumchya lihinyt ek jeevatpana aadhalto
mee fan aaahe tumcha

अनामित म्हणाले...

kharokhar ghadlay ka he asa !

pan tumchya lihinyt ek jeevatpana aadhalto
mee fan aaahe tumcha