मंगळवार, २ जून, २००९

आठवले ? आठवले !

आठवले का आठवले ?
कोण आठवले ? काय आठवले ?
नाही बुवा आठवले ! ॥धृ॥

अहो ते हो, कोणे एके काळचे
सिद्धार्थ वसतिगृहात राहणारे
आंबेडकरी जनतेचे कैवारी, लढवय्ये पॅन्थर ? -- १
अहो ते हो, शरदाच्या कृपाप्रसादाने
एका रात्रीत न्हाउन निघालेले
समाजकल्याण खात्याची झुल चढलेले ? -- २
अहो ते हो, वाघाच्या गुहेत शिरलेले,
नामांतर प्रश्नी त्याचे मन वळवणारे,
मग नामविस्तारावर तोड करणारे ? -- ३
अहो ते हो, रमाबाई नगरामध्ये
आपल्याच माणसांकडून थोबाड फ़ूटलेले,
तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्लेले ? -- ४
अहो ते हो, विधानसभा निवडणुकीत
राणा भीमदेवी थाटात,
दोनशे जागा लढणार म्हणणारे ? -- ५
अहो ते हो, दूसर्याच दिवशी कलटी मारणारे,
दोनशे नुसते म्हणायचे असते,
२५ पण लय झाल्या म्हणणारे ? -- ६
अहो ते हो, मराठा सरदारांच्या
जागा वाटपाच्या पंक्‍ती चालू असताना
आशाळभूत पणे बाहेर उभे असलेले ? -- ७
अहो ते हो, सरदारांनी झिडकारताच
कोपलेले, बंडाची भाषा करणारे
शेवटी कलानीला निळा टीळा लावणारे ? -- ८
अहो ते हो, गुढघ्याला बाशिंग बांधलेले
केंद्रात कॅबीनेटच पायजेल म्हणून रूसलेले
निदान राज्यमंत्री करा म्हणून विनवणारे ? -- ९
ना सोनियाचा प्रकाश, शरदाचे चांदणेही नाही
सहनही होत नाही सांगताही येत नाही
ज्यांना गल्लीतही कोणी विचारत नाही ? -- १०
अहो ते हो, मायावतीला घाबरलेले
आधी धम्म स्वीकारा म्हणून सांगणारे
डोळ्यावर पट्टी बांधुन हत्ती चाचपणारे ? -- ११
अहो ते हो, लोकांनी झिडकारलेले
पराभव न पचल्याने राडा करणारे
गद्दारी झाली म्हणून पेटलेले ? -- १२
अहो ते हो, दिल्लीश्वरांनी लाथाडलेले,
मंत्री नाहीतर राज्यसभेवर पाठवा म्हणणारे
नाही तर दूसरा विचार करू म्हणणारे ? -- १३
ते का ? अहो आता आठवले !
शरदाच्या चांदण्यात कोमेजलेले
भरकटलेले ,खचलेले ,संपलेले आठवले ! -- १४

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

aajun ek rahile, sakharpuda karun lagna visarnare te aathavale