शुक्रवार, १९ सप्टेंबर, २००८

वाटाड्या !

सालं हे नेहमीचेच आहे ! 'ट्रेक काढा , ट्रेक काढा' म्हणून हाकारा करायचा आणि काढला की काहीतरी कारण सांगून टांग मारायची. आजही तेच झाले. विसापूर-लोहगड-लेणी असा कार्यक्रम ठरला होता. पंढरपूर पॅसेंजर सूटायची वेळ झाली तरी व्हीलर बुक-स्टॉल जवळ आम्ही तीघेच, मी, माझा मुलगा व उदय सावंत ! शेवटी तर तिकीट काढायलाही वेळ मिळणार नाही अशी वेळ आल्यावर आम्ही तसेच गाडी पकडली व सामान ठेवायच्या रॅकवर स्थानापन्न झालो।
रात्री केव्हातरी मळवली आले आणि घाबरत घाबरत आम्ही फलाटावर उतरलो पण टीसीच काय , चिटपाखरूही आमच्या स्वागताला नव्हते। रेल्वे स्टाफच्या खोल्यांसमोरच्या फूटपाथवर आम्ही ताणून दिली व भल्या पहाटे विसापूर कडे कूच केले. गडाच्या तटबंदीच्या दिशेने चालत राहलो पण वर जायची वाट काही सापडेना. चालून चालून पायाची चाळण व्हायची वेळ आली पण वाट काही सापडेना, वाटेत दूसरे कोणी माणूस दिसेना. मग गावात शिरलो व कोणी वाटाड्या मिळेल का याची चौकशी करू लागलो. एका बाईने आपल्या १० वर्षाच्या मुलाला ५० रू. च्या बोलीवर सोबत दिले. त्याला घेउन आम्ही निघालो. थोडे पुढे गेलो तर पाठून एक परकरातली मुलगी पण येउ लागली. हा मुलगा तिला जा असे सांगू लागला तरी पण ती आमचा पिच्छा सोडेना. वाटेत तिच्या त्या मुलाबरोबर काही कानगोष्टी झाल्या व मग ती सुद्धा आमच्या सोबत येउ लागली. पोरटे अवलीच होते व बोलघेवडे. अनेक गंमति तो आम्हाला सांगत होता, शाळेच्या, मास्तरांच्या, वाट चूकणार्या ट्रेकर्सच्या, शेरातल्या (शहरातल्या) मुलांच्या ! बोलण्याच्या ओघात त्याने एका ट्रेकरचा कसा कॅमेरा चोरला ते पण सांगून टाकले.
थोड्याच वेळात आम्ही गडावर पोचलो। पाठीवरच्या सॅक आम्ही बाजूला काढून ठेवल्या. मी बायकोला फोन करून मोहीम फत्ते झाल्याचे कळवले. फोन कट करून मागे वळताना तो मुलगा सॅकशी काहीतरी चाळा करताना दिसला, पण अगदी ओझरता, त्या मूळे त्याला काही विचारले नाही. सॅकच्याच मागच्या कप्प्यात मी पैसे ठेवले होते पण ते मोजले नव्हते, ५०, १००, ५०० अशा नोटा होत्या त्यात. काही वेळ तटबंदी दाखवल्यावर अचानक तो मुलगा घाई करू लागला. मी तुम्हाला परतीची वाट दाखवतो, मला जरा घाई आहे, माझे पैसे द्या व मला सोडा. शेवटी तर तुम्ही माझे पैसे नाही दिलेत तरी हरकत नाही, मी चाललो. असे म्हणून तो निघाला सुद्धा ! त्याच वेळी गावातल्याच तरूण-तरूणींचा एक मोठा ग्रूप वरती आला. त्यांच्या बरोबरच तो मुलगा परत फिरला. त्याच्या डोळ्यातली चमक मी बरोबर हेरली. तुम्हाला मी परतीच्या वाटेपर्यंत सोडतो व परत फिरतो, माझे पैसे द्या. आम्ही तयार झालो. आता तो आमच्या , खास करून माझ्या मागेच राहू लागला. मध्येच त्या परकरी मुलीबरोबर तो १० मिनीटे पाठी थांबला व भलत्याच वाटेने ती दोघे पुन्हा आमच्यात सामील झाली. माझा संशय आता चांगलाच बळावला. वाटेत मी त्याला चोरी कशी वाईट याची एक बोधकथा सांगितली पण पैशाच्या मोहाने तो पार आंधळा झाला होता. आता आम्ही सपाट वाटेवरून चालत होतो. सूर्याच्या स्थितीमुळे आमच्या सावल्या बाजूलाच पडत होत्या. त्याच्या सावलीवरून माझ्या सॅकमधेले पैसे काढायचा त्याचा विचार स्पष्ट झाला. त्याने सॅकला हात घातला की लगेच मी माझा वेग वाढवत होतो पण तरीही तो शहाणा, सावध होत नव्हता. आता त्याने एक लहान काठी हातात घेतली व सॅकची चेन उघडली. काठी फेकून दिली व अधीरपणे कप्प्यात हात घातला. त्या क्षणी मी पाठी वळून त्याची मानगूट पकडली. त्याला मी अजिबात मारणार नव्हतो , फक्त माझे आधी चोरलेले पैसे परत घेणार होतो पण त्याने उलटाच कांगावा केला. 'शेरातली मुले माझे पैसे देत नाहीत , वर मलाच चोर ठररवत्यात, मारत्यात, वाचवा' असे बोंबलू लागला. सोबतची मुलगी पण 'वाचवा, वाचवा' असे ओरडू लागली. आता मात्र माझी तार सटकली. गावातले तरूण बर्यापैकी लांब होते, ते जवळ येउन आम्हाला घेरे पर्यंत मी त्या मुलाला लाथा- बुक्क्यांनी मारून अर्धमेला केला. गाववाले बाह्या सरसावून तयार झाले. मी शांतपणे पण ठामपणे त्यांना सगळा प्रकार सांगितला. याने तुमच्या गावाचे नाव खराब होईल असे सुनावले. सोबतच्या तरूणींवर शायनिंग मारण्यासाठी असेल कदाचित, त्यांचा रोख त्या मुलाकडे वळला. त्याने त्याला 'गावाचे नाव खराब करतोस, लाज नाही वाटत चोरी करायला' असे म्हणत चांगलेच बदडले. माझे चोरलेले पैसे, जे त्याने एका दगडाखाली लपवून ठेवले होते, २०० रू, परत द्यायला लावले. मग ते सगळेच गावाकडे निघाले. आम्ही परत वाट चूकलो पण आमचा वाटाड्याच भलत्या वाटेने गेल्यावर आम्ही तरी काय करणार ? परत गावाच्या वाटेने पाठी फिरणे धोक्याचे होते तेव्हा आम्हीच हिंमत करून एका घळीत उतरलो, साधारण तासभर खाचा-खळग्यातुन उतरल्यावर एकदाची आम्हाला पायवाट सापडली व मग आम्ही तडक लोहगड गाठला !

तेव्हा ट्रेकर मित्रांनो वाटाड्या सोबत घेताना काळजी घ्या नाहीतर तोच तुमची वाट लावायचा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: