गुरुवार, १६ ऑक्टोबर, २००८

परीकथेतील राजकूमार !

नेहमीपेक्षा कामावरून जरा लवकरच निघालो होतो. वडाळा , पश्चिमेला ब्रोकरकडे काम होते. स्टेशनला उतरलो आणि काहीतरी strike झाले. फलाटावरील बाकावर बसलेली ती बाई ओळखीची वाटत होती. हो कविताच होती ती ! वर्गातल्या मराठी मुलींमधील सर्वात देखणी, सर्वात जास्त भाव खाणारी, स्टेटस सांभाळणारी ! कॉलेजच्या गॅदरींगमध्ये 'परीकथेतील राजकूमारा' गाणे गाउन आम्हा सर्व मित्रांना तीने नादावून सोडले होते. ज्याला त्याला तो राजकूमार आपणच असे वाटले होते पण 'तो' कोणी तिसराच निघाला होता ! या गोष्टीला आता २० वर्षे झाली होती. पण 'ती' कविता आणि आता समोर असलेली यात जमीन-अस्मानाचा फरक पडला होता. पार वीटलेली दिसत होती, चेहर्यावर तेज उरलेच नव्हते, अनेक दु:खे पचवुन कशीबशी जगते आहे असेच वाटत होते. तिच्याशी मी आधीही कधी बोललो नव्हतोच आणि आता बोलायची काही गरजच नव्हती. मी वाट धरत असतानाच तिचा 'राजकूमार' सुद्धा पहायला मिळाला ! खरच 'काय पायलस याच्यात' अशी स्थिती होती. आम्हा मित्रांपैकी कोणीही अनेक बाबतीत त्याच्या पेक्षा सरसच भरला असता ! जाउ दे ! पसंद अपनी अपनी !


ब्रोकर कडे गप्पा-टप्पा झाल्यावर निघायला सहा वाजले। बर्यापैकी अंधारून आले होते आणि 'ती' दिसली. टॅक्सीची वाट पहात होती. ती होती क्वीनसी ! नावाप्रमाणेच राणी सारखी दिसणारी, गोवनीज ! रोझ डे मध्ये सलग तीन वर्षे 'Miss Roze' बहुमान मिळालेली ! पण तीला मित्रच काय मैत्रीणीही नव्हत्या ! नेहमी एकटी असायची. आमच्या मराठी वाड्मय मंडळाच्या कार्यक्रमाला मात्र हजेरी लावायची, मख्ख चेहर्याने ! अजूनही स्वत:ला तीने काय पण maintain केले होते ! मध्ये जणू काही काळ गेलाच नव्हता ! क्वीनसी बरोबर माझी तशी काहीच ओळख नव्हती पण काय वाटले कोणास ठाउक. कदाचित अनेक वर्षाने कोणी दिसते तेव्हा असे वाटतही असेल, मी तीला Hi केले व माझी ओळख दिली. तीने 'येस, आय नो यू' असे हसून म्हटले. काही क्षण असेच गेले आणि ती एकदम बोलली , माझे घर five gardern जवळ आहे, माझ्या बरोबर येतोस गप्पा मारत ?


तसे आमच्यात गप्पा माराव्या असे काही मुद्देच नव्हते, आम्ही दोघेही पूर्ण वेगळ्या जगातले होतो, भाषा, धर्म, आर्थिक स्थिती यात दोन ध्रूवांचे अंतर होते। नुसते चालणे चालू होते. बाग आल्यावर ती एका बाकावर बसली व मला जवळ बसायची खूण केली. थोडा वेळ पॉज घेउन तीने स्वत: विषयी बोलायला सुरवात केली. शून्यात नजर लावून ती बोलत होती पण अगदी मनापासून, तीचा आवाज अगदी आतला वाटत होता. भरपूरच संकटे तीने झेलली होती, अगदी तावून सुलाखून निघाली होती. तीच्या जीवनात मोठीच उलथापालथ झाली होती. अनेकांनी तीला फसवले होते, संकटात एकटे टाकले होते, तीचे लग्नही मोडले होते व आता ती अगदी एकाकी जीवन जगत होती. कमाल आहे त्या कवितेची अशी गत आणि कॉलेज क्वीन क्वीनसी ची अशी ! काय पण तकदीरचे खेळ आहेत. पण हे सर्व ती मला का सांगत होती ?


मी हे सर्व तुला का सांगते आहे ? हाच प्रश्न तुला पडला असेल ना ? माझ्या या अवस्थेला तूच जबाबदार आहेस !
मी ???? what non-sense !!
हो तूच ! माझ्या प्रेमाला तू झिडकारले नसतेस तर ----
मी तीला माझी परत ओळख करून दिली, आपण कधी एकमेकांशी एक शब्दही बोललो नाही हे पण सांगितले, मग मी तुला झिडकारायचा प्रश्न येतोच कोठे ?
तुला खरेच आठवत नाही आहे ? ok - तूझे डोळे खोटे बोलूच शकत नाहीत-- सगळ सांगते--


अकरावीत तू अगदीच शामळू होतास, बेताची उंची आणि हडकूळा पण तुझे डोळे व गालाला पडणारी खळी,। तेव्हाही मुलींमधे चर्चेचा विषय होती. बारावीच्या पुढे तुझ्यात खूपच बदल झाला. उंची वाढली, बुजरेपणा गेला, कॉलेजच्या अनेक activities मध्ये तू दिसू लागलास. मराठी वाड्मय मंडळाच्या कार्यक्रमात तू जास्तच खुलायचास. मराठी मला फारसे येत नाही पण निव्वळ तुला बघण्याकरता मी यायचे. अशाच तुमच्या एका गाण्यात "परीकथेतील राजकूमारा" हे गाणे ऐकले आणि तुझ्यातच तो राजकूमार मला दिसला.राजकूमाराचा शोध संपला ! कसे ते आठवत नाही, तुझे एक पुस्तक माझ्या हाती आले, त्यात मी "I LOVE YOU" अशी एक चिठ्ठी टाकली होती. माझे नाव म्हणून मी मोठा Q , त्याला राणीच्या चेहर्याचा आकार दिला होता, व शेवटी CY लिहीले होते॥


मेहताने माझे पुस्तक मला परत केले, ते चाळताना आतली चिठ्ठी मला सापडली। मी मेहताला म्हणालो 'अरे गाढवा , तुला कोणाला फसवताही येत नाही. माझ्या पुस्तकात तू जे प्रेम-पत्र टाकले आहेस त्याने मीच काय, कोणीही फसणार नाही. अरे मुलींना पैसेवाली, xx खाली मोटार-सायकल असलेली मुले आवडतात किंवा रावडी तरी ! आपण या व्याख्येत कोठेच बसत नाही. मेहता अगदी कळवळून बोलला "अरे मैने ये नही किया " , फिर दूसरा कोई होगा ! यावर सगळ्यानीच एकमेकांकडे बघितले. मी ते so called love letter---


पार तूकडे तूकडे करून खिडकीबाहेर भिरकावून दिलेस ! मी पार कोलमडले। माझी अशी काही अपेशाच नव्हती. माझ्या पाठी मुले वेडी होउन पळत असताना, तू -- तू --. एवढा स्वत:ला समजत तरी कोण होतास ? तुला चांगलाच धडा शिकवायचा होता मला. अनेक मित्र करून, तुझ्या समोर त्यांना नाचवणार होते, पण त्या आधीच तू कॉलेज सोडून कामाला लागला होतास असे कळले. मग मात्र अगदी भरकटत गेले, वाहवत गेले, कटी-पतंगा सारखी. अनेक धक्के पचवले, अनेक पुरूष आयुष्यात आले आणि गेले, कोणी मला फसवले, कधी मी कोणाला नाचवले, खेळवले, त्यांना पार वेडे करून 'सोडले'॥, असे केले की मला जणू सूड उगवल्याचे समाधान मिळ होते, पण यात मीच उध्वस्त होत चालले आहे हे मला कळलेच नाही. खूप खस्ता खाल्ल्या आणि आता एकाकी जीवन जगत आहे.


मी सुन्न झालो होतो. माझ्यासारख्या फटीचरच्या प्रेमात कॉलेज क्वीन पडली होती, तीने मला propose ही केले होते आणि माझ्या ते गावीही नव्हते ! थोडे सावरून मी तीला म्हणालो, 'दिल आया गधी पे तो परी क्या चीज है' अशी एक म्हण आहे, ती जरा उलटी केली पाहीजे. माझ्यावर प्रेम करून तरी तू कोठे सुखी झाली असतीस ? वेडेपणा होता तुझा ! तुला तेव्हा वर-खर्चाला जेवढे पैसे मिळायचे तेवढा माझा आजही पगार नाही. तेव्हा दु:खी होण्याचे काही कारणच नाही. we were totally mismatch for each other !
मुलांना असे का वाटते की मुलींना पैसेवाला, handsome च मुलगा आवडतो ? मला वाटते ज्याच्या खांद्यावर डोके ठेउन रडता यावे असा कोणी मुलींना हवा असतो। ज्याच्या डोळ्यात खोलवर बूडता यावे, डोळे मिटून विश्वास ठेवावा , असा कोणी. आणि तू तसा होतास !


परत भयाण शांतता, आम्ही दोघेही नि:शव्द झालो होतो--
माझ्या डोळ्यात बघून एका प्रश्नाचे अगदी खरे खुरे उत्तर देशील ?
विचार-
forget past, मध्ये काही वर्षे गेलीच नाहीत असे समज, i don't care about your current marital status, आता मला सांग--- माझा होशील ?
अर्थात मी फारसा वेळ नाही घेतला, ठाम स्वरात मी एवढेच म्हणालो;
ना ही !
आता मात्र तीचा बांध फूटला ! ती मान खाली घालून ओक्सा-बोक्षी रडू लागली. बायको रडते तेव्हा माझी स्थिती नेहमीच विचीत्र होते, काय करावे तेच समजत नाही ! आणि ही तर ---. मी तीला पूर्ण मोकळे होउ दिले. हळू हळू ती शांत झाली. डोळे पुसून तीने माझ्याकडे बघितले, अगदी डोळ्यात डोळे घालून. तीचा चेहरा आता विलक्षण शांत वाटत होता. पसन्न ! आणि आता तर ती अधिकच देखणी वाटत होती. मस्त हसून ती म्हणाली ,"किती ठामपणे नाही बोललास, बाकी शब्दांचा पसारा न मांडता, एकच 'नाही' पण आतून आलेला ! --- मला आता अगदी मस्त हलके वाटते आहे, मोकळे, relaxed ! वीस वर्षापुर्वी मला तुझ्या बाबत जी खात्री होती, विश्वास टाकण्याची, ती अगदी बरोबर होती. परीकथेतला राजकूमार मला तरी मिळाला होता--- next is destiny ! आता याच सहार्यावर मी माझे बाकी आयुष्य समाधानाने घालवेन ! good bye , forever !
-- आणि एकदाही मागे वळून न बघता, ती रस्ता ओलांडून निघूनही गेली ! अगदी कायमची, forever !

1 टिप्पणी:

Aditya म्हणाले...

Kaka,
Goshta khari ahe asa dharun chalto.Pan khari ka khoti yane farak padat nahi. Lihili mastach ahe tumhi!